For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेचा गलथान कारभार उघड; कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर नगरसेवकांचा संताप, स्वतः फावडा हातात घेत केली तुंबलेल्या गटाराची सफाई

04:50 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेचा गलथान कारभार उघड  कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर नगरसेवकांचा संताप  स्वतः फावडा हातात घेत केली तुंबलेल्या गटाराची सफाई
Advertisement

बेळगाव : शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभागातील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे आणि त्यातून पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने अखेर नगरसेवक शंकर पाटील यांनीच हातात फावडा घेत तुंबलेल्या गटाराची सफाई केली.

Advertisement

रिसालदार गल्ली ते गणाचारी गल्ली परिसरात गटारे तुंबल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार होती. रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आणि गटारांमधील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित स्वच्छता होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

ही बाब निदर्शनास येताच नगरसेवक शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वतः फावडा हातात घेत गटारातील घाण काढण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनाकडे तक्रारी करून थांबणार नाही, तर गरज पडल्यास प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करू, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement

दरम्यान, प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

नगरसेवकांनी प्रत्यक्ष गटार सफाई केल्याने महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकाराची दखल घेत प्रशासन प्रभागातील कचरा आणि तुंबलेल्या गटारांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

.