बेकिनकेरे महालक्ष्मी देवीची यात्रा 3 फेब्रुवारीपासून
लक्ष्मीदेवीची आज यथासांग पूजा, अभिषेक, महाआरती, सर्व देवतांची पूजा करून मूर्ती रंगकामासाठी देणार
वार्ताहर/उचगाव
बेकिनकेरे गावची जागृत ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा 3 ते 11 फेब्रुवारी 2026 मध्ये भरविण्याचा निर्णय लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीने घेतला आहे. यासंदर्भात लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी लक्ष्मीदेवीची यथासांग पूजा, अभिषेक, महाआरती तसेच गावातील सर्व देवतांची पूजा करून मूर्ती रंगकामासाठी देण्यात येणार आहे. यासाठी गावातील सर्व भाविकांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मीदेवीच्या मंदिरामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीदेवी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष जयवंत सावंत यांनी केले आहे. या बैठकीमध्ये रथ बनविणे, मंडप डेकोरेशन, वेगवेगळ्या दुकानांची मांडणी या संदर्भात विचारविनिमय करून बैठकीत निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी लक्ष्मीदेवी उत्सव कमिटीचे अध्यक्ष जयवंत सावंत होते.
बेकिनकेरे गावामध्ये लक्ष्मी यात्रा भरविण्यासंदर्भात यापूर्वी मार्च, एप्रिल दरम्यान बैठक घेण्यात येऊन रेडा, पालवाही सोडण्यात आलेला आहे. आता या यात्रेला दीड महिन्याचा अवधी शिल्लक राहिल्याने लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीने यात्रोत्सवासंदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी रविवारी सर्व लक्ष्मीदेवी उत्सव कमिटीची बैठक घेऊन या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रथमत: लक्ष्मी देवीच्या मंदिरातील मूर्तीला रंगकाम करणे तसेच मंदिराची रंगरंगोटी रथ बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व कॉन्ट्रॅक्टर तसेच लक्ष्मीदेवी यात्रा उत्सवात येणारे सर्व दुकानदार, खेळणी दुकानदार यांचे नियोजन तसेच लक्ष्मीदेवी गदगेला बसविण्यासाठी जागेचे ठिकाण व तेथील तयारी अशा अनेक विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बैठकीला नारायण भडांगे, मल्लाप्पा भातकांडे, अरुण गावडे, महादेव भडांगे, मोहन पवार, नारायण भोगण, सोमनाथ भडांगे, कृष्णा खादरवाडकर, नारायण बेळगावकर, मल्लाप्पा गावडे, गजानन मोरे, विठ्ठल नंदगडे, ईराप्पा गावडे, ज्ञानेश्वर कोळी, नागेंद्र बिर्जे, भावकू धायगोडे, प्रभाकर फडके हे कमिटी सदस्य उपस्थित होते. स्वागत गजानन मोरे यांनी केले. ज्ञानेश्वर कोळी यांनी आभार मानले.