आहे त्यात समाधानी राहण्याच्या वृत्तीमुळे मनुष्य वैराग्यसंपन्न होतो
साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी । आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ।। 10 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ब्राम्ही स्थिती प्राप्त झालेला योगी परब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचा अनुभव घेत असतो. योग्याची लक्षणे ऐकून अर्जुन भगवंतांना विनम्रतेने म्हणाला, कृष्णा, या लक्षणांचा विचार केला तर ती अंगी बाणवायला मी खरोखर फारच अपुरा आहे. परंतु तुमच्या उपदेशाने माझ्या अंगात ती लक्षणे रुजतील. त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले, ठीक आहे. अर्जुन समाधानी असल्याने ते त्याच्यावर प्रसन्न होते. भक्तराज अर्जुन आणि देव वेगवेगळे दिसत असले तरी मनाने ते केव्हाच एकरूप झाले होते. अर्जुनाने ‘मी ब्रह्म व्हावे’ अशी इच्छा व्यक्त केली, ती ऐकल्यावर श्रीकृष्णांच्या मनात आले की, अर्जुनाला आपण ब्रह्म व्हावे असे वाटू लागले आहे, म्हणजेच याच्या मनात वैराग्याचा उदय झाला आहे. वैराग्यरूपी वसंताच्या भराने ‘मी ब्रह्म आहे’ असा भावरूपी मोहोर दाटून आला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ याला मिळायला आता फार वेळ लागणार नाही. श्रीकृष्ण आपल्याशीच म्हणाले की, हा अर्जुन वैराग्याचा उपासक झालेला असल्याने त्याने कोणतेही कर्म करायला सुरवात करताच त्याला त्याचे फळ मिळेल. त्यामुळे त्याने केलेला अभ्यास वाया जाणार नाही. ह्यावरून असे म्हणता येईल की, एखाद्याने अमुक एक फळ पाहिजे म्हणून कर्म केले तरी त्याला हवे असलेले फळ मिळेलच असे नाही. पण फळाची इच्छा न करता कर्म जो करू असे जो म्हणेल, त्याला ते करायला सुरवात करताच फळ प्राप्त होत जाईल.
भगवंत उघड म्हणाले, अर्जुना, ब्रह्मरूप होण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग मी आता तुला सांगतो. ह्या मार्गाचे वैशिष्ट्या असं की, ह्यात प्रवृत्तीरुपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे लागतात. भगवंतांना असे म्हणायचे आहे की, या मार्गाने जो जाण्याला निघतो त्याने मनात जे जे कर्म करायचे ठरवले असते ते ते तो करू लागला की, त्या कर्मातील फळाची वासना त्याच्या मनातून निघून गेली असल्याने तो आपोआपच संसारातून निवृत्त होत जातो व मोक्षरूपी फळ आयतेच त्याच्या पदरात पडते. आहे त्यात समाधानी राहण्याच्या वृत्तीमुळे मनुष्य वैराग्यसंपन्न होतो. दासबोधाच्या दुसऱ्या दशकातील नवव्या समासात वैराग्यसंपन्न असण्याचे फायदे सांगताना समर्थ म्हणतात, वैराग्यातून येणाऱ्या विरक्तीतून उत्तम कीर्ती मिळते, मनुष्यजन्माचे सार्थक होऊन थोरवी प्राप्त होते. या गुणामुळे स्वस्वरूपसाक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. सुख उचंबळून येते, सद्विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते. सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता सरस्वतीच जिभेवर येऊन राहते. भगवंत पुढे म्हणाले, ह्या मार्गाचा श्रीशंकरांना एव्हढा मोह आहे की, ते अजूनही त्याचे यात्रेकरू आहेत. योग्यांचे समुदाय ह्या मार्गावरून अनुभवाच्या पावलांनी जात असल्याने तो मार्ग सुलभ झाला आहे.
क्रमश: