हिंदू असल्याने विवाह माझ्यासाठी पवित्र नाते
अमेरिकेतील अध्यक्षपदाचे दावेदार विवेक रामास्वामी यांचे वक्तव्य : श्रद्धेमुळेच इथवर पोहोचू शकलो
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या शर्यतीत सामील भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी मी एक हिंदू असून या माझ्या श्रद्धेमुळेच या अध्यक्षीय मोहिमेपर्यंत पोहोचलो असल्याचे म्हटले आहे. जगात एक देव असल्याचे मानणे आहे. या देवानेच आम्हा सर्वांना कुठल्या न कुठल्या उद्देशाने येथे पाठविले असल्याचे मला वाटते असे उद्गार रामास्वामी यांनी काढले आहेत.
मी एका पारंपरिक घरात लहानाचा मोठा झालो आहे. कुटुंब हाच खरा पाया असल्याचे माझ्या आईवडिलांनी शिकविले आहे. स्वत:च्या आईवडिलांचा आदर करणे आवश्यक आहे. तर विवाह हे अत्यंत पवित्र नाते असून याचा अपमान करणे चुकीचे आहे. आम्ही कधीच घटस्फोटाला स्वत:ची प्राथमिकता करत जगू शकत नाही. आम्ही देवासमक्ष विवाह करतो, दोन्ही जोडीदार यावेळी शपथ घेत असतात असे रामास्वामी म्हणाले.
देवावर माझी श्रद्धा असून यातून आम्हा सर्वांचे कर्तव्य असून ते ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याची शिकवण मिळते. आम्ही सर्वजण समान आहोत, कारण प्रत्येकात देवाचा वास आहे. हीच गोष्ट माझ्या श्रद्धेचा पाया असल्याचे रामास्वामी यांनी म्हटले आहे.
38 वर्षीय विवेक रामास्वामी यांचा जन्म ओहायो येथे झाला होता. त्यांचे आईवडिल हे भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. विवेक यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. तर येल येथे शिक्षण घेत असताना त्यांची भेट अपूर्वा यांच्याशी झाली होती. दोघांनीही 2015 मध्ये विवाह केला होता. तर त्यापूर्वी रामास्वामी यांनी स्वत:ची बायोटेक कंपनी रोइवंत सायन्सेसची स्थापना केली होती. रामास्वामी यांनी 2021 मध्ये या कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.