For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेचा शिलेदार काळाच्या पडद्याआड

06:50 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेचा शिलेदार काळाच्या पडद्याआड
Advertisement

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे 87 व्या वर्षी निधन

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

शिवसेनेचा कोहिनूर हिरा, शिवसेनेचे चाणक्य अशा सन्मानजनक पदव्यांनी गौरविलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे.  87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या  हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून शिवसेनेमध्ये प्रसिद्ध होते. तर राज्याच्या राजकीय वर्तुळात ‘जोशीसर’ म्हणून ते सर्वपरिचित होते. महापालिका ते लोकसभेचे सभापती व्हाया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास होता. कोहिनूर तांत्रिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्यावर दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सर्वपक्षीय नेत्यांसह मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.Shiv Sena's 'Kohinoor'

Advertisement

मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तथापि मध्यरात्री 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यासोबत कार्यरत असणाऱ्या अनेक नेत्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि मराठी माणसांविषयी तळमळ असलेला नेता गमावल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शिवसेनेला वैभवाचे दिवस दाखविण्यात मनोहर जोशी यांचे मोलाचे सहकार्य असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. तर उद्धव ठाकरे, शरद पवार, भाई जगताप, राहुल शेवाळे, गिरीश महाजन, दीपक केसरकर यांनी दादर येथे स्मशानभूमीत जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.

ब्रेन हॅमरेजचा  त्रास

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळी जवळपास महिनाभर मनोहर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. गुरुवारी हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची पहाटे 3 वाजता प्राणज्योत मालवली.

शेवटपर्यंत शिवसैनिक

शिवसेनेतला सुसंस्कृत चेहरा अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. त्यांना सर या पदवीने ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता, अशी त्यांची ख्याती होती. तसेच शून्यातून विश्व निर्माण करणारे, कडवट महाराष्ट्राभिमानी होते. त्यांच्या सरत्या काळात काही मानहानिकारक प्रसंग आले, पण अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणूनच ते जगले.

बाळासाहेबांच्या प्रभावामुळे राजकारणात

समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे 1967 पासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. तेव्हापासून मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे यांनी तऊणांना योग्य दिशा देत शिवसेनेचा झंझावात कायम ठेवला. त्यामुळेच मराठी जनांना मुंबईत मानाने जगता आले. ऐंशी टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रिद होते. त्याचा मनोहर जोशी यांनी शिवसेनेसाठी चांगला फायदा करून घेतला.

‘नांदवी ते वर्षा’

रायगड जिह्यातील नांदवी या छोट्याशा गावात 2 डिसेंबर 1937 रोजी मनोहर जोशी यांचा जन्म झाला. सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा व शिका’ या तंत्राने त्यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला. ध्येयाकडे लक्ष ठेवून त्यांची खडतर जीवनाला सुऊवात झाली. वडिलांबरोबर भिक्षुकी करून ते पैसे मिळवू लागले.

मनोहर जोशी यांनी चौथीपर्यंत नांदवी येथे, तर पाचवीला महाड येथे शिक्षण घेतले. सहावीनंतर शिक्षणासाठी ते पनवेलला मामांकडे गेले. शिक्षण घेताना ते वार लावून जेवण घेत असे सांगण्यात येते.  मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे राहिले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी किर्ती कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी एम.ए.,एल.एल.बी. केली. 1964 साली त्यांनी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

Advertisement
Tags :

.