बिहारमध्ये ‘पीके’ युगाचा प्रारंभ
प्रशांत किशोर यांचा ‘जन सुराज’ आता राजकीय पक्ष : मनोज भारती कार्याध्यक्ष
वृत्तसंस्था/ पाटणा
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी बिहारच्या राजकारणात एका नव्या राजकीय पक्षाने प्रवेश केला आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी बुधवारी स्वत: रितसरपणे राजकीय पक्षाची घोषणा केली. पाटणा येथे एका कार्यक्रमात त्यांनी राजकीय पक्षाचा प्रारंभ केला. त्याचे नाव ‘जन सुराज’ असे ठेवण्यात आले आहे. त्यांनी मनोज भारती यांना पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी मोठी तयारी केली. बिहारमधील राजकारणात सध्या प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांच्या ‘जन सुराज’ पक्षाने एन्ट्री केली आहे. त्यांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुऊ आहे. माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, पवन वर्मा आणि माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या पार्टीचा शुभारंभ करण्यात आला.
विरोधकांवर प्रहार
प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील पशुवैद्यकीय मैदानावर ‘जन सुराज’ची औपचारिक घोषणा केली. नवीन पक्षाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी ‘जय बिहार’चा नारा देतानाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केली. येथील जनतेला नोकरीच्या शोधात राज्याबाहेर जावे लागत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. तत्पूर्वी ते आपल्या शेखपुरा येथील घरातून पायी चालत पशुवैद्यकीय मैदानावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थकही होते. राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्या राजकीय पटलावर वादळ निर्माण करण्याची आशा आहे.
पक्षाच्या घोषणेपूर्वी 5000 किमी पदयात्रा
एक कोटी सदस्य असलेल्या पक्षाची स्थापना केली जाईल, असा दावा पीके यांनी केला आहे. पक्षाची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी 17 जिह्यांचा दौरा केला होता. या काळात त्यांनी 5 हजार किलोमीटरच्या पदयात्रेसोबतच 5 हजार 500 गावात चौपाल आणि सभा घेतल्या. प्रशांत किशोर यांनी स्थलांतरापासून बेरोजगारी, शिक्षण आणि मागासलेपणापर्यंतच्या समस्यांना आपल्या पक्षाचे राजकीय मुद्दे बनवले आहे.
विधानसभा निवडणुकीत पूर्ण क्षमतेने उतरणार
प्रशांत किशोर यांनी जाहीरपणे नितीशकुमार यांना बिहारमधील सत्तेवरून हटवण्याचे आवाहन केले आहे. 2025 ची बिहार विधानसभा निवडणूक ‘थ्री एस’ म्हणजेच ‘शराब’, ‘सर्व्हे’ (जमीन) आणि ‘स्मार्ट मीटर’ या मुद्यावर लढवली जाईल असा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत ‘जन सुराज’ पूर्ण क्षमतेने उतरणार आहे. तसेच चालू वर्षाच्या अखेरीस रामगढ, तारारी, बेलागंज आणि इमामगंज या चार मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीतही पीके यांचा पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बिहारमधील राजकीय पटलावर ‘रण’ संग्राम निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.