बेगडी तख्ताचे टेंडर रद्द...! मुख्याधिकाऱ्यांची घोषणा, शिवभक्तांकडून ‘तरुण भारत’चे आभार
दीपक प्रभावळकर राजधानी सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराजांनी राजधानी सातारा वसवली. त्याच राजधानीत त्यांचे फायबरचे तख्त बनवण्याचे टेंडर तत्काळ रद्द करण्यात आले आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून साऱ्या प्रशासनाच्या खुर्च्या डगमगल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या सुमुहूर्तावर ‘बाप्पा मोरया’ म्हणत छत्रपती शिव-शंभूभक्तांनी आनंद व्यक्त केला.
शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या शाहू महाराजांनी शहर वसवले आणि राजधानी केली. सव्वा तीनशे वर्षानंतरही त्यांचे साताऱ्यात स्मारक नाही. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ज्या सिंहासनावर बसून दिल्लीचा बादशहा ठरवला ते सिंहासन प्रातिनिधीक स्वरुपात फायबरचे बनवण्याचे टेंडर सातारा नगरपालिकेने जाहीर केले होते.
पाकिस्तानला सुद्धा धडकी येईल
छत्रपती शाहूंचे साम्राज्य अटक ते कटक होते. सध्याचे पाकिस्तानसुद्धा शाहूरायांच्या अखत्यारित होते. अशावेळी छत्रपती शाहू महाराजांचे तख्त बनवताना त्याचा विचार राष्ट्र नव्हे तर परराष्ट्रव्यापी झाला पाहिजे होता.
पालिका झाली खडबडुन जागी
‘तरुण भारत’चे वृत्त प्रसिद्ध होताच सातारा नगरपालिका प्रशासन खडबडुन जागे झाले. त्यांनी केलेले टेंडर तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निर्णय घेणारे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे प्रशिक्षणासाठी बारामतीमध्ये असल्यामुळे त्यांच्या सहीने यावर शिक्कामोर्तब होईल.
शिवभक्तांकडून ‘तरुण भारत’चे आभार
शिवकार्यासंदर्भात गेली कित्येक वर्षे काम होत आहे. मात्र अलिकडेच त्याला राजकारणाचे स्वरुप लागले आहे. राजकोटवरुन ते सिद्ध झाले. आता नव्याने राजकारण उफाळू नये यासाठी ‘तरुण भारत’ने घेतलेली भूमिका स्तुत्य आणि महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याची भूमिका शेकडो शिवभक्तांनी व्यक्त केली.