For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी सद्गुरुंचे स्मरण करावे

06:40 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी सद्गुरुंचे स्मरण करावे
Advertisement

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन। दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते।। 11 ।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार, योगाभ्यासाला माणसाला समाधान वाटेल असे ठिकाण असावे. अशा स्थानाचे महत्त्व इतके असते की, नास्तिक सहज जरी येथून गेला तरी त्याला तेथे थांबून तपश्चर्या करावी असे वाटते. हे स्थान सुंदर आणि अतिशय पवित्र असल्याने येथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. तेथे नेहमी फळणारी अशी दाट झाडे असावीत, पाण्याचे झरे सहजी आढळावेत. मनाला प्रसन्न करणारे पक्षी आसपास असावेत. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. यापैकी जे मनाला आवडेल अशा ठिकाणी एकांतात बसावे. आपले मन तेथे स्थिर राहते की, नाही ते पहावे आणि राहत असेल तर तेथे आसन लावावे. योगाभ्यासास सुरवात करण्यापूर्वी ज्या आसनावर बसायचे ते आसन कसे असावे ह्याबद्दल माउली पुढे सांगत आहेत. ते म्हणाले, तळास टोकदार दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालावे. त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले राहतील असे घालावेत. दर्भ हे एकप्रकारचे पवित्र गवत आहे. दर्भावर कृष्णाजीन घालून तयार झालेले आसन फार उंच किंवा अगदी पातळ असू नये कारण फार उंच झाले तर शरीर कलंडेल आणि पातळ होईल तर जमिनीचा गारवा बाधू शकेल.

पुढील श्लोकात प्रत्यक्ष योगाभ्यास कसा करावा ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, आधी सांगितल्याप्रमाणे आसन व्यवस्था करून मन एकाग्र करावे. चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून योग्याने अंत:करणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.

Advertisement

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी। आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे ।।12।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, योगाभ्यास करण्यास पोषक ठिकाणी एकाग्र अंत:करण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. त्यांच्या आदरपूर्वक केलेल्या स्मरणाने अहंकाराचा कठिणपणा नाहीसा होऊन, स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावांनी व्यापला जातो. त्याला विषयांचा विसर पडतो, विषयांचा विसर पडल्याने इंद्रियांची रग मोडते कारण ती आता त्याला वाटेल तसे वाकवू शकत नाहीत. अंत:करणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. नुसत्या सद्गुरूंच्या स्मरणाने जर इतक्या गोष्टी साध्य होत असतील तर त्यांची कृपा झाल्यावर काय काय होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे.

पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले की, काया म्हणजे शरीराचा मधला भाग, मस्तक व मान सरळ ठेवावी. कोणतीही हालचाल न करता स्वत:च्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टि लावावी. इतरत्र कुठेही पाहू नये.

शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ। दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे?।।13 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आधी सांगितल्याप्रमाणे आसनावर बसल्यानंतर अनुभव येऊ लागतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.