व्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी?
अन्यथा स्कोअर कमी होऊ शकतो
नवी दिल्ली :
आजच्या जमान्यात प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब क्रेडिट कार्डचा वापर करत आहे. यामध्ये विविध प्रकारची खरेदी करणे किंवा घरी आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत घेण्यासाठीही क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. मात्र हेच क्रेडिट कार्ड बंद करताना काय करावे लागणार याविषयी आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमच्या सिबिल स्कोअरवर लक्षणीय परिणाम होतो, ज्याचा परिणाम वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा कार कर्ज घेण्यावर मोठा होतो. व्रेडिट कार्ड बंद करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहुया.
कार्ड बंद करण्याचे नकारात्मक परिणाम
क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट वापर प्रमाण (सीयुआर) आणि क्रेडिट इतिहासावर सर्वाधिक परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 2 लाख रुपयांची मर्यादा आणि 50,000 रुपयांचा खर्च असलेली दोन कार्डे असतील, तर सीयुआर 25 टक्के आहे. जर तुम्ही 1 लाख मर्यादेसह कार्ड बंद केले तर ते 50 टक्केपर्यंत वाढेल आणि स्कोअर 50 ते 100 गुणांनी कमी होऊ शकतो. क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमचा सरासरी क्रेडिट इतिहास कमी होतो, ज्याकडे बँका आणि कर्ज संस्था नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.
क्रेडिट स्कोअरचा परिणाम
क्रेडिट मिक्स म्हणजे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अशा विविध प्रकारच्या क्रेडिटची शिल्लक आहे. जर तुम्ही कार्ड बंद केले तर ही शिल्लक बिघडू शकते आणि सिबिल स्कोअरवर 10 टक्के परिणाम होऊ शकतो. म्हणून, जुने उच्च मर्यादा कार्ड बंद करणे नवीन कार्डपेक्षा जास्त हानिकारक आहे.
फायदे आणि तोटे
फायदे: कार्ड बंद केल्याने वार्षिक शुल्क वाचते, खर्च कमी होण्यास मदत होते आणि कार्ड व्यवस्थापन सोपे होते. नोकरी बदलण्यासारख्या मोठ्या जीवनातील बदलांदरम्यान कार्ड बंद करणे देखील आवश्यक असू शकते. तोटे: स्कोअर घसरू शकतो, कर्ज नाकारण्याचा व उच्च व्याजदरांचा धोका वाढतो. तसेच, क्रेडिट कार्डचा सकारात्मक पेमेंट इतिहास कायम राहतो, परंतु एकूण परिणाम नकारात्मक असू शकतो.