2005 पूर्वी बिहारमध्ये होते जंगलराज
जंगलराजमध्ये 32 हजार जणांचे अपहरण : अमित शाह यांचा दावा
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारमध्ये एकेकाळी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी यांच्या शासनकाळात जंगलराज होते, या जंगलराजचा खात्मा नितीश कुमार यांनी केला. लालू-राबडीदेवी शासनकाळात 32 हजार जणांचे अपहरण झाले हेते. याचबरोबर नरसंहाराच्या 12 मोठ्या घटना घडल्या होत्या. 2005 पूर्वी पूर्ण बिहार जंगलराजच्या विळख्यात सापडले होते. सर्व उद्योग, व्यापार बंद झाले होते. केवळ अपहरण आणि खंडणीवसुलीचा व्यवसाय सुरू होता. क्रूर गुन्हे लालूप्रसाद-राबडीदेवींच्या शासनकाळात व्हायचे. बिहारमध्ये जंगलराज पुन्हा आणण्याची राजदची इच्छा असल्याचा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील प्रचारसभेत बोलताना गुरुवारी केला आहे.
लखीसराय येथील सभेत शाह यांनी मतदारांना रालोआला विजयी करण्याचे आवाहन केले. जेव्हा बूथवर जाल, तेव्हा रालोआच्या घटक पक्षांच्या चिन्हावर मतदान करा. रालोआला असा विजय मिळवून द्या की, त्याचे झटके इटलीपर्यंत जाणवले पाहिजेत. लालूप्रसाद यादवांकडुन चारा घोटाळा करण्यात आला. नोकरीच्या बदल्यात गरीब लोकांच्या जमिनी हिरावून घेण्यात आल्या. तर पूर मदतीच्या नावावर घोटाळा झाला होता, अशी आठवण शाह यांनी करून दिली. आमचे सरकार लखीसराय येथे दोन वर्षांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.
राहुल गांधींकडून छठी मैयाचा अपमान
राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मातोश्रीला अपमानित केले, अपशब्द उच्चारले आणि मग छठी मैयाचा अपमान केला आहे. बिहारमध्ये माता सीतेला छठी मातेच्या स्वरुपात पूजले जाते. परंतु राहुल गांधी भारताच्या संस्कृतीबद्दल अनभिज्ञ आहेत. राहुल गांधींचे आजोळ इटलीत असल्यामुळेच त्यांनी या देवीचा अपमान केल्याची टीका शाह यांनी मुंगेर येथील सभेत बोलताना केली आहे.
रालोआने वाढविला माताभगिनींचा सन्मान
लखीसरायचा जो सिंदूर आहे तो केवळ सिंदूर नव्हे तर आमच्या माताभगिनींच्या सौभाग्याचे प्रतीक आहे. पंतप्रधान मोदींनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे ऑपरेशन चालविले, त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देत आमच्या माताभगिनींचा सन्मान पूर्ण जगात वाढविला असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.