Kolhapur : खोचीत मधमाशांचा कहर ; प्रवासी- जनावरे जखमी
खोची दुधगाव रस्त्यावर मधमाशांचा उपद्रव वाढला
खोची : खोची ता. हातकणंगले येथील दुधगाव गोंड येथे सलग दोन मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अनेक प्रवासी, जनावरे जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक व प्रवासी चिंताग्रस्त झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, खोची दुधगाव रस्त्यावरील खोची वारणा नदी बंधाऱ्या शेजारील वळूराज मंदिराच्या लिंबाच्या झाडाला मधमाशांनी या चार दिवसात पोळे केले आहे. हे झाड मोठे व एकदम रस्त्याकडेला असल्याने या झाडाखालूनच या मार्गावरील प्रवासी रहदारी करतात. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जवळून जोडणारा हा मार्ग असल्याने तसेच या ठिकाणी नवीन पूल झाल्याने या मार्गावरून प्रचंड रहदारी असते.
सोमवारी दिवाळी दिवशी सकाळी साडेसातच्या दरम्यान या ठिकाणी झाडावर असलेल्या मधमाशीच्या घरट्यावर पक्षानी हल्ला केला. यामध्ये मधमाशा मोठ्या प्रमाणात उठल्या. तसेच झाडाखाली असलेल्या युवराज पाटील यांच्या म्हशीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला.
यामध्ये सदर म्हैस मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाली आहे. अमृत पाटील यांच्या जनावरांच्यावर हि हल्ला केला. यावेळी या ठिकाणाहून निघालेले खोची येथील रावसाहेब नाईक व दीपावली घेऊन नातलगांच्याकडे निघालेले सहा ते सात प्रवासी जखमी झाले.
दरम्यान पुन्हा मंगळवारी सकाळी मधमाशांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मोटरसायकल चालकांच्या व घरट्या जवळील जनावरांच्या वरती हल्ला केला. यामध्ये आज पुन्हा आठ ते दहा प्रवासी जखमी झाले. यामधील जखमीवर खासगी रुग्णालयात औषध उपचार चालू आहेत.