फसवणूक झाली ? घाबरु नका, डायल करा 1930
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
आज प्रत्येकालाच मोबाईलचे पुरते व्यसन लागले आहे. दोन मिनिटांपूर्वी मोबाईलवर नजर मारलेली असते. पण पुन्हा-पुन्हा मोबाईल चालू करायचा आणि दोन मिनिटांपूर्वी पाहिलेले अॅप्स पुन्हा एकदा पाहायचे. ही सवय आता जवळपास सर्वांनाच लागल्याचे दिसून येते. दरम्यान एखादा मेसेज असला तर पूर्ण वाचायच्या भानगडीत न पडता त्यावर क्लिकही केले जाते. एखाद्या नवख्या नंबरवरून फोन आला तर त्याची खात्री करून न घेता संभाषण सुरू केले जाते. येथेच ‘मोबाईल ट्रॅप’ किंवा ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात आपले पहिले पाऊल पडलेले असते.
‘मोबाईल ट्रॅप’ आणि ‘डिजिटल अरेस्ट’ हे शब्द जरा भारी आहेत. पण आपल्या बोली भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला जाळ्यात अडकवायला सुरुवात झालेली असते. ज्या फोनवर आपण बोललो आहे, त्या माणसाला या क्षणी नाही पण पुन्हा दोन-तीन फोन करून नक्की फसवू शकतो याची खात्री फसवणाऱ्याला झालेली असते. मोबाईल फोनच्या माध्यमातून फसवणूक ही गुह्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. यातील फसवणूक करणाऱ्यांना घरात शिरून तिजोरी कपाटातून पैसे दागिने मिळवावे लागत नाही. किंवा लपतछपत रात्रीच्या वेळी चोरी करायला फिरावे लागत नाही. कटावणीने घराचे, तिजोरीचे दार उचकटवायला ताकद लावावी लागत नाही. चोरी करण्यासाठी जाताना किंवा येताना कोणी पकडण्याची, अंगभरून मार खाण्याची वेळ येत नाही. पण मोबाईलद्वारे अगदी व्यवस्थित बोलत बोलत समोरच्याच्या बँक खात्यातील रक्कम त्या भामट्याला मिळवता येते. भामट्याला एवढी खात्री असते की ज्याला आपण फसवलेले आहे तो काही लगेच पोलिसात तक्रार करायला जात नाही. अर्थात त्यावेळेस भामट्याला खात्यावरील पैसे उचलण्यासाठी फारसे अवघड जात नाही.
कोल्हापुरात तीन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने तीन कोटी रुपयांची फसवणूक झाली. ज्या भगिनी यात फसल्या आहेत, पैसे घालवून बसल्या आहेत. त्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. समाजात आजूबाजूला काय घडत आहे हे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे .पण तरीदेखील त्या संमोहित झाल्याप्रमाणे भामट्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. पोलिसात तक्रार झाली आहे. आरोपी सापडतील, नाही सापडतील. पैसे परत मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. पण असे कसे सहज फसलो या प्रश्नानेच त्या अक्षरश: व्याकुळ झाल्या आहेत. आपण असे सहज फसत गेलो हे त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला सांगून सांगून आता थकल्या आहेत.
अर्थात अशी फसवणूक फक्त कोल्हापुरातच होत आहे असे नाही. थेट चोरी करण्यापेक्षा मोबाईलचा वापर करून काहीतरी भीती घालून अशी फसवणूक करणाऱ्या टोळ्या देशभरात सक्रिय झाल्या आहेत. जयपूरमध्ये बसून कोल्हापूरच्या माणसाला फसवणे त्यांना सहज शक्य झाले आहे. मोबाईलचा वापर करून असे पैसे मिळतात याची भामट्यांना अगदी 100 टक्के खात्री झाली आहे. त्यामुळेच त्यांनी फसवणुकीचे तंत्र बदलले आहे. मोबाईल हेच माध्यम फसवणुकीसाठी वापरले जात आहे.
आता फसवणूक करणाऱ्यांकडून फोन येतात. हे फोन काहीतरी आपत्ती जनक घटना झाली आहे हे सांगण्यासाठी असतात .किंवा तुम्ही किंवा तुमचा मुलगा एखाद्या मोठ्या गुह्यात आरोपी आहे. ताबडतोब हे प्रकरण मिटवा असा दम देणारेही काही फोन असतात. ते फोन व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करत केले जातात. फोन करणाऱ्यांचे कार्यालय, तिथला बडेजाव हे सारे व्हॉट्सअॅपवर दिसत असते . ते पाहून फसणाऱ्याला साहजिकच घाम फुटलेला असतो. मग तो अक्षरश: फोनवरचा माणूस तिकडून जे सांगत असतो तसे इकडे करत असतो. क्षणाक्षणाला त्याच्या बँक खात्यातून पैसे जायला सुरुवात झालेली असते. एवढे झाल्यावर लगेच तक्रार करण्यापेक्षा फसगत झालेला माणूस स्वत:ला कोंडून घेतो. आपण असे कसे फसलो म्हणत डोके धरून बसतो. मग हळूहळू भानावर येतो. आपण कसे फसलो हे सर्वांना एक दोन दिवस अगदी क्षणाक्षणाचे वर्णन करत सांगत बसतो. मग कोणीतरी तक्रार करण्याचा सल्ला दिला की पोलिसांकडे धाव घेतो. .तोवर भामटा पैसे उचलून मोकळा झालेला असतो. काही फसवणूक झालेले तर तक्रार करायच्या भानगडीतच पडत नाहीत. अनेकदा वस्तूस्थिती अशीच असल्याचे दिसून येते.
आपण जगाच्या गप्पा करतो पण फोनवर फसलो गेले आहोत हे सांगायला अनेकजण तयारच होत नाहीत. याचाच फायदा भामट्यांनी घेतला आहे. काळोखी रात्र, टेहळणी, चोरीसाठी रिस्क असले काहीही करावे न लागता समोरच्याच्या खात्यावरील पैसे भामटे मिळवत आहेत. किती खबरदारीच्या सूचना पोलिसांनी, जिल्हा प्रशासनाने दिल्या तरी भामट्याच्या गळाला एखाद दुसरा तरी माणूस सहजपणे लागतो.
- 1930 नंबरला लगेच फोन करा
आर्थिक फसवणूक टाळणे हे 100 टक्के आपल्याच हातात आहे. आपल्याला कोणीतरी अनोळखी माणूस फोनवर काहीतरी सांगतो आणि आपणही संमोहित झाल्याप्रमाणे त्याचे सारे आदेश पाळतो. यातून शंभर टक्के आपली फसवणूक करून घेतो. त्यासाठी कोणताही फोन आला की त्याच्यावरून कोणी काहीही सांगितले तरी विश्वास ठेवू नये. अशा फोनवर आपला खाते नंबर फोन करणाऱ्याला सांगणे इतर आर्थिक व्यवहारांची माहिती देणे हे टाळावे. पण तरीही आपण एखाद्या जाळ्यात अडकलो आणि आपल्या खात्यावरून पैसे गेल्याचे कळताच 1930 या आर्थिक गुन्हे शाखेच्या फोन नंबरवर तक्रार करावी. वेळेत तक्रार आली तर नक्कीच फसवणूक झालेली आपली रक्कम रोखता येते. ती रक्कम भामट्यांना उचलता येत नाही. त्यामुळे आपणच सतर्क असणे गरजेचे आहे.
- सतीश होडगर पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर.
- काय करायचे ते कर...
काही महिन्यांपूर्वीपर्यंत कोल्हापुरातील तरुणांना तुम्ही अश्लील स्वरूपाच्या गुह्यात सामील आहात असे फोन आणि एडिट केलेली दृष्ये मोबाईलवरून पाठवली जात होती. अमुक इतकी रक्कम नाही मिळाली तर हे दृष्य व्हायरल करणार अशी धमकी दिली जात होती. साहजिकच तरुण घाबरत होते. पण वारंवार असे फोन येऊ लागल्याने ही फसवणूक असल्याचा अंदाज तरुणांना आला. यानंतर त्यांनी असे फोन आल्यावर ‘काय करायचे ते कर. किती व्हिडिओ व्हायरल कर आमचे काही बिघडत’ नाही अशा स्वरूपाच्या कोल्हापुरी भाषेत उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अशा फोन कॉलचे प्रमाण कमी झाले आहे.