‘तरुण भारत’मुळे बीएड्च्या विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
तिसऱ्या प्रवेश फेरीत अर्ज करण्याची मुभा मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान
बेळगाव : शिक्षण खात्याच्या नव्या नियमावलीनुसार अनेक उमेदवार बीएड् प्रवेशपासून वंचित राहण्याची शक्यता होती. दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या फेरीला प्रवेशच देण्यात न आल्याने अनेक उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडले. ‘तरुण भारत’ ने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली असून, तिसऱ्या फेरीतील उमेदवारांना आता चौथ्या फेरीतही अर्ज दाखल करण्याची मंजुरी देणारा आदेश शुक्रवारी काढण्यात आला. यामुळे बीएड् उमेदवारांमधून ‘तरुण भारत’चे आभार मानण्यात आले. बीएड् प्रवेश प्रक्रियेवेळी नियमावलीत अचानक बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. यापूर्वी दुसऱ्या फेरीत योग्य कॉलेज न मिळाल्याने पुढच्या फेरीत अर्ज केलेल्यांना संधी दिली जाते. परंतु यावेळी दुसऱ्या फेरीत कॉलेज मिळालेल्यांना तिसऱ्या फेरीसाठी अर्ज दाखल करता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यामुळे ज्या उमेदवारांना प्रवेश नाकारला त्यांना तिसऱ्या फेरीत अर्ज करता येत नसल्याने ते प्रवेश प्रक्रियेपासून बाहेर फेकले गेले.
प्रशासनाला चूक लक्षात आल्याने नियमात बदल
प्रवेश मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, या समस्येकडे ‘तरुण भारत’ने लक्ष वेधून घेत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर उमेदवार व त्यांच्या पालकांनी बीएड् प्रवेशाबाबत अधिकारी तसेच मंडळाकडे इमेलद्वारे आपल्या तक्रारी मांडल्या. अखेर प्रशासनाला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी यामध्ये बदल करत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे. या संदर्भात शुक्रवारी आदेश बजावला असून विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.