स्वयंरोजगाराद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा!
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : महिला दिन कार्यक्रमात आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यासच त्यांचे सबलीकरण झाल्याचे म्हणता येईल. महिलांनी बँकांमार्फत, एनआरएलएम योजनेंतर्गत मिळणारे कर्ज मिळवून स्वयंरोजगार सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करावा. केवळ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याच्या प्रकाराला फाटा द्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केले.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात शनिवार दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमानिमित्त समाजाच्या विविध स्तरात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन करून राहुल शिंदे बोलत होते. महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. कौशल्यविकास, उद्योजकता-जीवनोपाय खात्याने महिलांना अत्यल्प व्याजदरात कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. महिलांना उद्योजकता क्षेत्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पात 500 उपाहारगृहे (अक्क कॅफे) सुरू करण्याची घोषणा केली होती. यापैकी दुसरे उपाहारगृह बेळगाव जिल्हा पंचायतीच्या आवारात सुरू करण्यात आले आहे. बेळगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या उपाहारगृहांना मिळालेल्या भरीव प्रतिसादाबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या आवारात अक्क कॅफे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. महिलांनी स्वयंरोजगाराद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याबरोबरच देशाच्या विकासाला योगदान द्यावे, असेही शिंदे म्हणाले.
प्रमुख पाहुणे या नात्याने जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नावर यांनी विचार मांडले. आज महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत असून हे महिलावर्गाला अभिमानास्पद आहे. त्यानंतर जिल्हा पंचायतीच्या लेखापरीक्षक डॉ. गंगा हिरेमठ यांनी विचार मांडले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), मनरेगा, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोपाय अभियान व जलजीवन मिशन योजनेमध्ये उत्तमरितीने कार्य करीत असलेल्या 20 महिलांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कावेरी पाटील यांनी, सरकारच्या योजनांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा पंचायतीचे मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, साहाय्यक संचालक जयश्री नंदेण्णावर, कार्यालयीन व्यवस्थापक बसवराज मुरघामठ, अधीक्षक सुशिला वण्णूर, शिल्पा चौगुला, जिल्हा पंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.