देवदूत बना...
एक दिवस छोटे छोटे कीटक, उडणारे प्राणी, पक्षी, देवाकडे आले आणि देवाला म्हणू लागले ‘त्या परी राणीला तू सुंदर जादूची काठी दिलीस पण आम्हाला मात्र काही दिलं नाहीस!’ देवाने सगळ्यांची समजूत काढली. जादूने आपल्या हातात तशीच काठी निर्माण केली. आणि सांगितलं हीच ती काठी...ही घेऊन कुणाला उडता येते का बघा! आणि नाहीच उडता आलं, तर ह्या काठीतला एक एक गुण आपल्यामध्ये घेता येतोय का बघा! झालं, सगळे कीटक त्या काठीवर येऊन झुंडीच्या झुंडी बसू लागले. कुणी त्याच्यावर पाय टेकवले तर कोणी त्या काठीवर आपल्या सोंडेने किंवा तोंडाने त्याच्यातलं काही ओढून घेता येते का बघू लागले. असं करता करता काही प्राणी ज्यांना नीट बसायला जागा नव्हती त्यांची शेपटीची बाजू त्या जादूच्या काडीला चिकटली होती. त्यांना काहीच घेता येईना. आता देवांनी सगळ्यांना घरी जायला सांगितलं. काहींनी पायाने जोर लावला होता, तर काहींच्या सोंडेमध्ये, मीशांमध्ये जोर आला होता. काहींच्या तोंडामध्ये जोर आला होता पण ज्यांची बाजू शेपटीच्या बाजूने टेकली होती त्यांना काहीच कळेना की आपल्या बाबतीत नेमकं काय झालं. बाकीच्या प्राण्यांनी आपल्या सोंडेने दुसऱ्याला दंष करून बघितलं, काही जणांनी आपल्या पायाला लागलेल्या वाईट वृत्तीचा उपयोग अन्नामध्ये विष कालवण्यासाठी केला, पण या छोट्या कीटकांना मात्र आपल्याला नेमकं काय मिळाले हे शोधता येईना. एक दिवस सूर्य मावळल्यानंतर चंद्र काही उगवलाच नाही. हे छोटे छोटे कीटक आता आपल्याला अंधारात उडता येणार नाही म्हणून घाबरले. एक कीटक घाबरून उडत या फांद्यावरून त्या फांद्यावर गेला आणि काय आश्चर्य त्याच्या शेपटी खालून छोटासा उजेडाचा एक अंश सगळ्यांना दिसला. बाकीचेही कीटक उडायला लागले आणि प्रत्येकाच्या शेपटी खाली एक छोटासा उजेड तयार झाला होता. यालाच आम्ही काजवा असं म्हणतो. बाकीच्या प्राण्या पक्षांनी जादूच्या काडीतून दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी काहीतरी उचललं होतं, पण ह्या छोट्या कीटकांना मात्र कळत नकळत त्या काडीची चांगली बाजू लाभली होती. ती त्यांनी आपल्यात सामावून घेतली होती. आता या जंगलातून कधीही अंधारातून कोणाला जायचं असेल तर हे काजवे त्यांना एका विशिष्ट दिशेला सुखरूप नेऊन पोचवत असत. पण ह्यातल्या काही काजव्यांना मात्र अभिमान झाला की आम्हाला सुंदर असा प्रकाश देवाने दिलाय. मग ते काजवे रात्रभर झोपूनच राहू लागले. कुणालाही मदतच करायची नाही असं त्यांनी ठरवलं. देवाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी ह्या काजव्यांना उचललं आणि थेट लांब दूरच्या प्रदेशात नेऊन ठेवलं. आता दुसऱ्यांना प्रकाश द्यायचा नाही हे त्यांनी आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ते ज्या प्रांतात आले होते तिथे सहा सहा महिने सूर्य मावळतच नव्हता. झालं, आता किती वेळ झोपून राहणार? त्यांना काही कळेच ना. सहा महिने त्यांनी अगदी तगमग करत ते आयुष्य काढलं आणि देवाला प्रार्थना केली की देवा आमचं चुकलं, आम्हाला तू दिलेलं वरदान समजलंच नाही. देवाने त्यांना नॉर्वे सारख्या देशात नेऊन ठेवलं होतं. तिथे सूर्य मावळतच नाही आणि अशा किड्यांचा उपयोगच होत नाही. आता मात्र ह्या किड्यांना कळून चुकलं होतं की असं जगणं आपल्यासाठी काही उपयोगाचे नाही. ते देवाला शरण गेले, आता देवाने त्यांना माफ केलं आणि पुन्हा ते पूर्ववत काजव्याच्या रूपामध्ये आपापल्या गावी परतले. आता हे सर्व काजवे देवदूतासारखे दुसऱ्यांच्या उपयोगी पडायला लागले. आणि मग देवाने त्यांना देवदूत म्हणून पाठवायचं ठरवलं. दुसऱ्याच्या उपयोगी पडेल तो खरा देवदूत. असे देवदूत आम्हाला आमच्या अडचणीच्या काळात संकटाच्या काळात कुठेतरी वेगवेगळ्या रुपात भेटतच असतात.