एकटीने फिरण्याच्या भीतीमुळे...
आजही रात्रीच्या वेळी महिला एकट्या फिरु शकत नाहीत, ही परिस्थिती अवांछनीय असली तरी सत्य आहे. ही स्थिती केवळ भारतातच आहे, असे समजण्याचे कारण नाही. ती प्रगत मानल्या गेलेल्या देशांमध्येही आहे. रात्री महिला एकटी फिरु लागली, तर अपप्रवृत्तीच्या लोकांकडून तिचा पाठलाग केला जाणे ही नेहमीची बाब आहे. त्यामुळे अगदी धाडसी स्त्रियाही रात्री घराबाहेर पडणे टाळतात. मात्र, अनेक महिलांना कामासाठी किंवा नोकरीसाठी रात्री प्रवास करावा लागतो.
अमेरिकेच्या व्हर्जिनीया प्रांतातील क्लेअर वायकॉफ नामक युवतीने या समस्येवर जो तोडगा शोधला आहे, त्याचे आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. तिलाही रात्री कामासाठी नित्यनेमाने घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे तिला वारंवार असुरक्षितेचा अनुभव घ्यावा लागत होता. परिणामी तिला रात्री बाहेर पडण्याची भीती वाटू लागली होती. पण काम सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने कोणत्याही स्त्रीला सुचला नसता, असा उपाय शोधून काढला आणि या त्रासातून स्वत:ची सुटका करुन घेतली. आता ती केवळ कामासाठीच नव्हे, तर नुसती फिरायलाही रात्री-बेरात्री निर्धास्तपणे बाहेर पडू शकते. कितीही वेळ बाहेर राहू शकते.
तिने आता चक्क स्वत:चे रुपांतर ‘पुरुषा’त केले आहे. मात्र, हा लिंगपरिवर्तनाचा प्रकार नाही. ती घरात स्त्रीच असते. पण तिने आपली केशशैली आणि वेषभूषा यांच्यात मोठे परिवर्तन केले आहे. रात्री घराबाहेर जाताना ती पुरुषाची वेषभूषा करते. तिने आपले केसही पुरुषांसारखे छोटे केले आहेत. हे वेषांतर इतके पुरुषसमान आहे, की कोणालाही ती महिला असल्याचे समजत नाही. त्यामुळे तिचा कोणी पाठलाग करीत नाहीत. तसेच तिच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्नही करत नाहीत. यामुळे ती रात्री कितीही वेळ सुरक्षितपणे बाहेर फिरु शकते. ती रात्री जॉगिंगच्या व्यायामालाही घराबाहेर जाऊ शकते.