For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्य देहावर प्रेम करत असल्यामुळे त्याला आत्मज्ञानाचा विसर पडतो

06:27 AM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनुष्य देहावर प्रेम करत असल्यामुळे त्याला आत्मज्ञानाचा विसर पडतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, मागील अध्यायात तुला सांगितलेला कर्मयोग हा जुनाच आहे. ह्या अविनाशी कर्मयोगाची परंपरा तुला थोडक्यात सांगतो. हा कर्मयोग सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला परंतु काळ जसजसा पुढे सरकला तसतसे कर्मयोगाचे महात्म्य कमी होऊन तो पुढे लुप्त झाला. ह्या अर्थाचा

अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला । पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ।। 2 ।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार इक्ष्वाकूनंतर ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे आणखी काही राजर्षी होऊन गेले पण पुढे हळूहळू तो लोप पावला कारण प्राणिमात्रांचा सगळा भर “काम” या विषयावर होता आणि ते देहालाच सत्य मानत होते. हा देह म्हणजेच मी असे वाटून ते देहाला जपू लागले. त्याला काही त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेऊ लागले. त्याचा अत्यंत विपरीत परिणाम झाला.

देहावरच प्रेम करत असल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. ज्या बुद्धीचा उपयोग करून आत्मज्ञान करून घ्यायचे तीच आडमार्गाकडे नेऊ लागल्यामुळे लोकांना विषयातच आत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहाचेच विचार प्राणांपेक्षा प्रिय झाले. ज्या गावात वस्त्रs घालीत नाहीत, त्या गावाला उंची वस्त्रांचा काय उपयोग? किंवा जन्मापासून अंध असणाऱ्याला सूर्याचा काय उपयोग? किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देईल काय? किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याची आवड कधी निर्माण होईल काय? चंद्राचा उदय होण्यापूर्वी ज्यांचे डोळे मिटतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखतील? त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमादेखील पाहिली नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहित नाही, सत्य व असत्य याची भाषा ज्यांना समजत नाही, त्या अज्ञानी, महामुर्ख लोकांना माझी प्राप्ती कशी होईल? असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला, हे काही कळत नाही. त्यामुळे बहुतेक समाज ह्या योगपरंपरेपासून दूर गेल्याने हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला.

लोक प्रपंचात आकंठ बुडाले असल्याने त्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडला, त्यांचे कर्मयोगाकडे दुर्लक्ष झाले. हा भगवंतानी सांगितलेला विचार फार महत्त्वाचा आहे. माणसाने प्रपंच करावा पण तो करत असताना देवाला विसरू नये. तो स्वत:ला कर्ता समजत असल्याने असे घडते. अर्जुनाचीही अशीच फसगत झाली होती. आपल्यामुळे हे कौरव मरणार असे त्याला वाटत होते. प्रत्यक्षात कौरवांच्या दुष्कृत्यांची शिक्षा देण्यासाठी अर्जुनाची नेमणूक ईश्वरी इच्छेनुसार झालेली होती. आपल्या मनासारखे आपण घडवू शकलो तर दु:ख राहणारच नाही परंतु असे घडताना दिसत नाही. ह्याचाच अर्थ असा की, कर्ता कुणीतरी दुसराच असतो.

भगवंत पुढे म्हणाले, अर्जुना तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच पुरातन योग, मी तुला सांगितला. हे उत्तमातले उत्तम रहस्य भगवंतांना अर्जुनाला जवळचा सखा म्हणून, जीवश्च कंठश्च मित्र म्हणून सांगावेसे वाटले. ह्यातून भगवंताचे अर्जुनावर मित्र म्हणून असलेले आत्यंतिक प्रेम दिसून येते कारण आपल्या हृदयातील अत्यंत गुप्त गोष्ट मनुष्य एकवेळ नातेवाईकांना सांगणार नाही पण जवळच्या मित्राला नक्की सांगतो. असाही निष्कर्ष काढता येईल की, जे भगवंताचे अनन्य भक्त असतात आणि सख्य भक्तीच्या माध्यमातून त्यांची भक्ती करत असतात त्यांच्याशी भगवंत बोलतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.