पायाचे ‘तीर्थ’ विकून श्रीमंत
साधुसंतांच्या पायाचे तीर्थ प्राशन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण असे तीर्थ विकून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केल्यास ते पाप मानले जाते. तथापि, चीन या देशात एका युवतीने स्वत:चे पाय धुतलेले पाणी विकून पैसा मिळविण्याची युक्ती शोधल्याची घटना घडली आहे. येथे एका पारंपरीक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात काही युवती लिंबू-पाणी भरलेल्या टबमध्ये पाय सोडून बसल्या. पाय धुवून झाल्यानंतर त्यांनी ते पाणी कपांमध्ये भरले आणि त्याची विक्री करण्यास प्रारंभ केला. साधारणपणे 600 रुपयांना एक कप अशा दराने या पाण्याची विक्री होऊ लागली. आश्चर्याची बाब अशी की अनेक लोकांनी हे पाणी खरेदी करुन त्याचे प्राशन केले. या युवतींनी या पाण्याच्या विक्रीचा स्टॉलच या मेळ्यात उघडला. ‘हे केवळ मनोरंजनासाठी आहे,’ असे या स्टॉलवर लिहिण्यात आले होते. हे पाणी विकत घेण्यासाठी इतकी माणसे जमली, की मेळ्याच्या संयोजकांना हा स्टॉल बंद करण्याचा आदेश द्यावा लागला.

या घटनेचे व्हिडीओ चित्रण झाले असून ते सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक दर्शकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा पाण्याच्या विक्रीला मेळ्याच्या आयोजकांनी अनुमती अशी दिली, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अशा पाण्याच्या प्राशनामुळे रोगराई पसरण्याचा धोका असल्याने असा प्रकार कोणी करु नये, अशी सूचना काही लोकांनी केली आहे. तर या युवतींच्या आणि मेळ्याच्या संयोजकांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशीही सूचना अनेकांनी केली आहे. काही लोकांनी या युवतींवर आणि त्यांचे ‘चरणतीर्थ’ पिणाऱ्यांवर ते अत्यंत बेजबाबदार असल्याची टीका केली आहे. ही कृती पूर्णत: बेकायदेशीर असून या युवतींच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी सूचना होत आहे. एकंदर या घटनेने एक सनसनाटी निर्माण झाली असून, तिची बरीच चर्चा आहे.