सौंदर्य....
मॅडम माझी मुलगी तन्वी खूप हुशार आहे. परंतु अलीकडे काय झालंय तेच कळत नाही हो. ऑनलाईन अभ्यास नकोच म्हणते. गेले आठ दिवस ती जो कोर्स करते आहे त्याची लेक्चर अटेंड केली नाहीत. का त्याचे कारण कळत नाही. तिच्याजवळ बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती बोलतच नाही. नुसती रडते आहे. काय करावे सुचत नाही. अचानक असं काय झाले असेल की तनु लेक्चर अटेंड करणं नको म्हणते? कुणाशी भांडण नाही, वाद नाही. तिचा तो स्वभावच नाही. अभ्यास आणि आपण..इतकी एकाग्र होणारी मुलगी पण आता ऑनलाईन लेक्चर नकोच म्हणते. लेक्चरच अटेंड केले नाही तर अभ्यास कसा होणार? मॅडम मला खूप टेन्शन आलंय काय करावे सुचत नाही. प्लीज काहीतरी करा..तन्वीच्या आई अगदी काकुळतीला येऊन बोलत होती. हो..पाहुया काय करता येईल तुम्ही काळजी करु नका. दुसऱ्याच दिवशी त्या तन्वीला घेऊन आल्या.
तनु तशी मुळातच कमी बोलणारी मुलगी तिला बोलतं करणं म्हणजे आपलं संवाद कौशल्य किती हे आजमावण्यासारखेच होते. अगदी सुरवातीला थोडा हलका फुलका संवाद साधत ती कम्फर्टेबल झाल्यावर हळूहळू काही गोष्टी उलगडत गेल्या. तनुला ऑनलाईन शिकण्यामध्ये अडचण नव्हती. परंतु कॅमेरा ऑन केल्यानंतर ती काही वेगळी दिसते हे तिच्या मनावर कोरलं गेलं होतं.
एकदा मित्र मैत्रीणींच्या ऑनलाईन भेटीमध्ये सारे खूप दिवसांनी एकमेकांना पहात होते. गप्पा रंगात आल्या होत्या. खूप दिवसांनी अशी भेट होत असल्याने सगळेच उत्साहत होते. गप्पा, थट्टा, एकमेकांची चौकशी हे सुरु असताना तनुच्या एका मैत्रिणीने तिला विचारले, ‘ए...तनु..तू अशी काय दिसतेस. चेहरा काही वेगळाच झालाय तुझा.. कित्ती लठ्ठ झालेयस..
तन्वी- हो. वजन वाढलं आहे थोडं.
तन्वी वजन वाढलं की वाढलेच बघ. ते कमी करायला खूप कष्ट घ्यावे लागतील. असू दे गं माया..बोअर लेक्चर देऊ नको तिला. जरा खात्यापित्या घरची वाटतेय आता ती.. असे म्हटल्यावर सगळेच हसले. तिला दुखावणे हा कुणाचा उद्देश नव्हता परंतु मित्रमैत्रिणींचे हे चिडवणे कुठेतरी आत लागून गेले होते. आपण नीट दिसत नाही. खूपच जाड झालो आहोत. आपला चेहरा खूपच ओबडधोबड झाला आहे. मी चांगली दिसतच नाही. हा विचार तिला सतत अस्वस्थ करत होता. ती करत असलेल्या कोर्सचे लेक्चर अटेंड करताना टिचरनी कॅमेरा ऑन कर सांगितले की ती अस्वस्थ व्हायची. सारे मला हसणार..ही भीती कुठेतरी मनात होती. परिणामी ती ऑनलाईन लेक्चर्स चुकवू लागली. तन्वी सारखीच त्या दिवशी भेटायला आलेल्या स्नेहाची ही अवस्था झाली होती. तिचा सावळा रंग तिला अस्वस्थ करत होता. गोऱ्या व्यक्तींचीच छाप उत्तम पडते, त्यांचेच व्यक्तीमत्व सर्वांनाच आवडते. आपण तर सावळे आहोत. आपला हा सावळा रंग आपल्या प्रगतीच्या आड येणार अशी समजूत मनामध्ये पक्की झाली होती. परिणामी स्नेहाचा आत्मविश्वास कमी झाला होता आणि ती सर्वांपासून थोडी अलिप्त रहायला लागली होती.
सौंदर्याबद्दलचा दृष्टिकोन, त्यांचा स्वत:शी चाललेला संवाद, विचार करायची पद्धत हे सारे वेगळ्या पद्धतीने संवाद साधत त्यांचे त्यांनाच लक्षात आणून देणे गरजेचे होते. काही सेशन्स नंतर एकंदरच सौंदर्याविषयीचा दृष्टिकोन, विचार, होणारी गल्लत या साऱ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. काही तंत्र आत्मसात करत त्या अस्वस्थतेतून प्रयत्नपूर्वक त्या बाहेर पडल्या.
सौंदर्य, प्रत्येकाचा दृष्टिकोन, वास्तव, आंतरिक सौंदर्याचे महत्त्व अशा अनेक विषयांवर चर्चा करावी लागली.
आपण सुंदर दिसावे असं कुणाला बरं वाटत नाही? लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांनाच वाटतं. ‘टीन एज’ मध्ये याबाबत अधिकच हळवेपण असते. आपण सुंदर दिसावं असं वाटणं, त्यासाठी प्रयत्न करणे हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु आपण सुंदर असणे नसणे, आपली शरिरयष्टी हे बऱ्याच प्रमाणात अनुवांशिकतेवर अवलंबून असते. त्यामध्ये तात्काळ बदल करता येत नाही. परंतु योग्य आहार, व्यायाम, त्वचेची योग्य काळजी घेतल्यास आपली त्वचा तजेलदार होऊ शकते. शरीराची मूळ ठेवण जरी बदलता आली नाही तरी ते बेडौल होऊ नये, अंगी चपळता रहावी यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतो. या साऱ्यासोबत कपड्यांची योग्य निवड, रंगसंगती याबाबत सजग राहिलं तर बाह्य सौंदर्याची छाप पडू शकते. परंतु खरेतर सौंदर्याविषयीच्या कल्पना, लावण्यात येणारे निकष, देशकालानुसार व्यक्तीच्या आवडी निवडीनुसारही वेगवेगळे असतात. कुणाला गोऱ्या रंगाचं आकर्षण असतं, कुणी म्हणतं सावळी माणसे अधिक स्मार्ट दिसतात, कुणाला घारे डोळे आवडतात तर कुणाला काळेभोर डोळे भुरळ घालतात. काहींना गोल चेहरा आवडतो तर काहींना उभा चेहरा म्हणूनच सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं असं म्हटलं जातं.
त्यामुळे केवळ बाह्यरुप म्हणजे सौंदर्य नव्हे. आपले विचार, वर्तणूक, कर्तृत्व काय आहे? त्याचे सौंदर्य किती? हे फार महत्त्वाचे आहे. समजा एखादी व्यक्ती बाह्यरुपाने सुरेख आहे परंतु चेहऱ्यावर कपाळावर सतत आठ्या, तुसडेपणा, सारखी चिडचिड या गोष्टी असतील तर ती व्यक्ती कुणाला कितीशी आवडेल? याउलट वरकरणी दिसायला देखणं रुप नसलेलं परंतु आत्मविश्वासयुक्त हसरा चेहरा, समजूतदारपणा, दुसऱ्याला आपलंसं करुन घेण्याची क्षमता असणारं व्यक्तीमत्व सर्वांनाच भावतं. तुमचं कर्तृत्व तुम्हाला सौंदर्य प्राप्त करुन देतं. जेमतेम पाच फूट उंची लाभलेल्या शास्त्राrजींनी आपल्या कर्तृत्वाच्या झेपेने भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले. सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा यांच्या आंतरिक सौंदर्याने आणि कर्तृत्वाने जगाला आपलेसे केले. त्यांचे ते तेज चेहऱ्यावर झळकतेच. वरकरणी बाह्यरुपाचाच प्रभाव पडतो असे वाटत असले तरी आपण जे रुप घेऊन जन्माला आलो आहोत. त्याचा स्वीकार करुन खऱ्या अर्थाने आपला ‘स्व’ ओळखणे, आत्मविश्वास संपादन करुन आंतरिक सौंदर्य जपत कर्तृत्वाचे सौंदर्य कसे खुलेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
याबाबत अब्राहम लिंकन यांचे वाक्य लक्षात ठेवण्याजोगे आहे. ते म्हणतात, ‘आपण जन्माला येताना जो चेहरा घेऊन येतो, तो परमेश्वराने दिलेला. परंतु नंतर आपला चेहरा बनतो तो असतो आपण घडवलेला. हे वाक्य लक्षात ठेवलं तर कर्तृत्वाच्या सौंदर्याला बरीच झळाळी येईल हे मात्र खरे!!
अॅड. सुमेधा संजिव देसाई