For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळंबा तलाव सुशोभिकरणाला ब्रेक

01:34 PM May 12, 2025 IST | Radhika Patil
कळंबा तलाव सुशोभिकरणाला ब्रेक
Advertisement

कोल्हापूर / धीरज बरगे :

Advertisement

कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाला गेल्या दीड महिन्यांपासून ब्रेक लागला आहे. पेव्हींग ब्लॉक बसविणे, बैठक व्यवस्था अशी सुरु असलेली कामे अर्धवट स्थितीत थांबली आहेत. बरेच दिवस काम थांबल्याने तलावावर सकाळी, सायंकाळी फेरफटका मारणाऱ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसुविधा होत आहे. त्यामुळे सुशोभिकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरालगत असलेल्या कळंबा तलावावर पहिल्या टप्प्यात आमदार सतेज पाटील यांच्या निधीतून वॉकिंग ट्रॅक, प्रवेशद्वार सुशोभिकरण, ओपन जिम, बंधारा मजबूतीकरण अशी कामे करण्यात आली. सध्या दुसऱ्या टप्प्यात वॉकिंग ट्रॅकवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बैठक व्यवस्था, झाडे लावणे, खेळणी बसविणे, ओपन जीम, लॉन, मनोरा दुरुस्ती अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामाला सुरुवातही झाली. पण सुशोभिकरणाचे काम सध्या निम्म्यातच थांबले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून काम जैसे थे स्थितीत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

  • फिरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसुविधा

कळंबा तलाववर सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण-तरुणी यांची गर्दी असते. नव्याने तयार केलेल्या वॉकिंग ट्रॅकचाच वापर बहुतांश जणांकडून केला जातो. मात्र सध्या येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे आणि बैठक व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. हे काम अर्धवट स्थितीतच थांबविल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसुविधा होत आहे.

  • ओपन जीम बंद असल्याने नाराजी

वॉकिंग ट्रॅकच्या येथे असणारी ओपन जीम पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी बंद केली आहे. फिरायला येणाऱ्या नागरिकांकडुन व्यायाम करण्यासाठी या ओपन जीमचा वापर केला जात होता. मात्र सध्या ओपन जीमचे साहित्य तिथे नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

  • मनोऱ्याची तत्काळ दुरुस्ती आवश्यक

तलावाच्या सांडव्याकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या मधोमध आकर्षक असा मनोरा आहे. या मनोऱ्याच्या येथे तलावाची पाणीपातळी दर्शवली जाते. सध्या या मनोऱ्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. मनोऱ्या भोवतीचे संरक्षक ग्रील तुटले असून सद्यस्थितीत मनोरा धोकादायक बनला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक तलावावर येतात. यावेळी येथील मनोऱ्याला ते आवर्जून भेट देतात. त्यामुळे येथील मनोऱ्याची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

सुशोभिकरण गतीने पूर्ण होणे आवश्यक

कळंबा तलावाचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यास तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे. सुशोभिकरणानंतर पर्यटनस्थळ म्हणून कळंबा तलावाचे मार्केटिंग झाल्यास येथे नक्कीच पर्यटकांची गर्दी वाढेल. यामधून स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे तलावाच्या सुशोभिकरणाचे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे.

                                                                                                             - शिवतेज सावंत, शिवसेना विभाग प्रमुख कळंबा.

  • सुशोभिकरण गतीने होण्यासाठी पाठपुरावा

कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तलाव परिसराचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. तलाव परिसर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रच आहे. तसेच येथे पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळे तलावाचे सुशोभिकरण गतीने होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

                                                                                                              - पुनम जाधव, उपसरपंच कळंबा तर्फे ठाणे.

Advertisement
Tags :

.