ओंकार' हत्तीला दांड्याने मारहाण
व्हिडिओ व्हायरल, जनतेतून तीव्र संताप ; कारवाईची मागणी
मयुर चराटकर
बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या 'ओंकार' नावाच्या रानटी हत्तीला दांड्याने मारहाण करून हाकलून लावण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, जनतेतून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा दांड्याने मारहाण करणाऱ्याकडे शासकीय दडूका असुन त्या व्हिडिओत वनविभागाच्या डोळ्या देखत हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे या दांडा मारणाऱ्याचे नाव पुढे येणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून 'ओंकार' नावाचा एकटा हत्ती आपल्या कळपापासून दूर भटकत आहे. या हत्तीने परिसरातील भातशेती आणि बागांचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या हत्तीला मानवी वस्तीतून दूर करण्यासाठी वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून अमानुष पद्धतीचा वापर केला जात असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, 'ओंकार' हत्तीला दांड्याने मारून हाकलले जात असल्याचे दिसत आहे. एका रानटी प्राण्यासोबत अशा प्रकारे क्रूरपणे वागणे अत्यंत निंदनीय असून, वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. "गेले दोन महिने हा हत्ती एकटा आहे, त्याला योग्य पद्धतीने हाताळण्याऐवजी मारहाण करणे चुकीचे आहे," अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.हा सगळा प्रकार किळसवाणी असून, या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी स्थानिक जनतेकडून होत आहे.वन विभागाने हत्तीला शांतपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यासाठी प्रशिक्षित पथकाची मदत घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान, 'ओंकार' हत्तीला पकडण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम सुरू केल्याचे यापूर्वी वृत्त आले होते. मात्र, हत्ती पकडण्याऐवजी त्याला मारहाण करून हाकलण्याचा प्रकार समोर आल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या अमानुष घटनेबद्दल वन विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जनतेच्या तीव्र मागणीमुळे आणि व्हिडिओच्या पुराव्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.