जावयाकडून मारहाण : सासऱ्याचा मृत्यू
पलूस :
जावयाने सासऱ्याला विटांनी जबर मारहाण केली. यामध्ये सासऱ्याचा हदयविकाराने मृत्यू झाला. तर पत्नी व सासू जखमी झाल्या. ही घटना पलूस तालुक्यातील बांबवडे येथे घडली. याबाबत सासू संगिता पवार यांनी जावई व त्याचा भाऊ दोघांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, प्रशांत पाटील व शितल पाटील यांचा विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. सर्वजण बांबवडे येथे माहेरी राहतात. बुधवार 1 जानेवारी रोजी दुपारच्या वेळेस सासू संगिता पवार, सासरे जगन्नाथ पवार, मुलगी शितल पाटील, नात प्रितीशा, नातू शिवांश हे सर्वजण घरी बसले होते. त्यादरम्यान जावई प्रशांत पाटील व मनोज पाटील (दोघे रा. तुरची ता. तासगाव) हे दोघेजण काळया रंगाच्या अल्टोकार मधून बांबवडे येथे सासरवाडीत आले. त्यावेळी मुले आपल्याकडे येत नाहीत. या कारणावरून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले.
सासू संगिता व पत्नी शितल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी सासरे जगन्नाथ पवार हे भांडण सोडवण्यासाठीमध्ये पडले असता. जावई प्रशांत राजाराम पाटील याने सासरे जगन्नाथ यांच्या डोक्यात विटांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने ते बेशुध्द अवस्थेत कोसळले. त्यांना उपचारासाठी पलूस ग्रामीण रूग्णालयात हलवले. त्यावेळी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सासरे जगन्नाथ पवार यांचा मृत्यू हदयविकाराने झाल्याचे नमूद होते. पवार यांची या अगोदर हदयविकाराची शत्त्रक्रिया झाल्याचे पत्नी संगिता यांनी सांगितले. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जावई प्रशांत व त्याचा भाऊ मनोज पाटील याच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.