तळेखोल -उसप रस्त्यावर अस्वलाचे दर्शन
अस्वलाची छबी मोबाइलमध्ये कैद
दोडामार्ग - वार्ताहर
तळेखोल-उसप रस्त्यावर एक अस्वलाचे दर्शन झाले आहे. मंगळवारी रात्री फोंडाहून (गोवा) उसप येथे घरी परतत असताना उसप येथील मळीक कुटुंबियांना या अस्वलाचे दर्शन झाले. या अस्वलाची छबी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहे.उसप येथील मळीक कुटुंबीय मंगळवारी रात्रौ फोंडा हून तळेखोल मार्गे उसप येथे घरी परतत होते. दरम्यान रात्री ८ वा.च्या सुमारास तळेखोल ते उसप रस्त्यावर त्यांच्या कार समोर अचानक अस्वल आले. यावेळी एक अजगर देखील रस्ता ओलांडत होता. अस्वल व अजगराला पाहताच कारमधील कुटुंबीय घाबरले. मात्र, त्यांनी लागलीच त्या दोघांचे फोटो त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केले. अचानक आलेल्या गाडीच्या प्रकाशामुळे अस्वलही काहीसे बिथरले व कार समोर रस्त्यावर धावू लागले. यावेळी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही काढले. काही वेळानंतर अस्वलाने जंगालत धूम ठोकली. उसप परिसरात दोन वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला त्याच्या काजू बागायतीत एका अस्वलासहीत दोन पिल्लांचे दर्शन झाले होते. तसेच सध्या काजूचा हंगाम असून मंगळवारी पुन्हा या परिसरात अस्वल दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या परिसरात अस्वलाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.