शिवठाण गावात अस्वलाचा हैदोस
शेतकऱ्यांच्या बागा-पिकांचे मोठे नुकसान : संरक्षण, उपायासह नुकसानभरपाईची मागणी
वार्ताहर/हलशी
शिवठाण (ता. खानापूर) येथे गेल्या काही दिवसांपासून अस्वलाच्या हालचाली वाढल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून अस्वलाने अनेक बागा आणि पिकांचे नुकसान केल्याची घटना घडत असून स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप केला आहे. गावातील शेतकरी राजाराम मिराशी आणि विष्णू मिराशी यांच्या चिकूच्या बागांसह शिवठाण येथील एकूण चार बागांमध्ये अस्वलाने मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे सांगितले जात आहे.
चिकूच्या झाडांची मोडतोड, फळांचे नुकसान तसेच मिरची आणि इतर पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अस्वल फिरत असल्याचेही पाहिल्याचा दावा केला आहे. अस्वलाच्या सततच्या हालचालीमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाया मजुरांनाही धोका निर्माण झाला असून काही शेतकरी सध्या रात्री शेतात जाणे टाळत आहेत. तालुक्यात गेल्या काही महिन्यांत हिंस्त्र प्राण्यांच्या हालचाली वाढल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
वन विभागावर दुर्लक्षाचा आरोप
ग्रामस्थांच्या मते, या घटनेबाबत वारंवार कळवूनही वन विभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे किंवा प्राण्यांना जंगलात परत पाठवण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
नुकसानभरपाईची मागणी
अस्वलामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. शिवठाण गावातील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासन आणि वन विभागाने तातडीने लक्ष घालून ठोस कारवाई करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.