कणकुंबी चेक पोस्टजवळ अस्वलाचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी
कणकुंबी (ता. खानापूर) : चौकी (कणकुंबी) येथील गुरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला चढवला असून बुधवारी( दि.२५) सकाळी साडेनऊच्या सुमारास कणकुंबी चेक पोस्ट परिसरात सदर घटना घडली. या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव दशरथ वरंडेकर( वय वर्षे ६०) असे आहे. दशरथ वरंडीकर हे बुधवारी सकाळी गुरे चरायला जवळच्या डेल्टा परिसरातील जंगलात गेले असताना अचानक हस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे.
जखमी दशरथ वरंडेकर यांना कणकुंबी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु वरंडेकर यांच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने व कणकुंबी आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तातडीने त्यांना बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना केएलई रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कणकुंबी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.