पाच मिनिटांमध्ये व्हा तणावमुक्त !
सांप्रतच्या काळात माणसाला सर्वाधिक भेडसावणारी समस्या ‘मानसिक तणाव’ ही आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अतिशय वाढल्यामुळे मानसिक तणावातही वाढ होत आहे. हा मानसिक तणाव पुढे आपल्या शरीरावरही आपला दुष्पभाव दाखवतो आणि माणसाला अनेक प्रकारच्या शारीरीक व्याधी जडतात, असे वैद्यकशास्त्र सांगते. त्यामुळे डॉक्टर्सही ताण कमीत कमी घेण्याची सूचना करतात.
ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योगव्यायाम, प्राणायाम आदी उपाय केले जातात. हे सर्व आध्यात्मिक मार्ग आहेत. त्यांच्याच संदर्भात मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्याचे नाव घेतले जाते. हा जिल्हा प्राचीन संस्कृती आणि विविध पुरातन मंदिरांमुळे सर्वपरिचित आहे. या जिल्ह्यातील छत्तरपूर याच नावाच्या शहरात ‘किशोर सागर’ तलावाच्या निसर्गरम्य परिसरात एक ‘आध्यात्मिक संग्रहालय’ आहे. त्याचे वैशिष्ट्या असे की तेथे गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये तणावमुक्ती होते. अनेकांनी तसा त्यांचा अनुभव कथन केला आहे. या संग्रहालयाचे निर्माणकार्य ‘प्रजापिता ब्रम्हकुमारी’ या संस्थेने केले आहे. प्रत्येक वर्षी सहस्रावधी भाविक या संग्रहालयाला भेट देतात. तणावमुक्तीचा एक सुलभ आणि सुगम मार्ग अशी या संग्रहालयाची ख्याती आहे. या संग्रहालयातील वातावरण, तेथे जतन करण्यात येणारी आध्यात्मिक साधने आणि तणावमुक्तीचे प्रशिक्षण यामुळे कोणत्याही कारणांमुळे आलेला तणाव निश्चितपणे दूर होतो, असे अनेकांचे प्रतिपादन आहे. या संग्रहालयात तणावमुक्तीचा अभ्यासक्रमही शिकविला जातो.
हा सात दिवसांचा अभ्यासक्रम पूर्णत: नि:शुल्क आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रथम दिनी हे संपूर्ण संग्रहालय दाखविले जाते. तणावमुक्ती संदर्भातील पायाभूत माहिती आणि ज्ञान मिळावे यासाठी हे संग्रहालय पहावयाचे असते. त्यानंतर या अभ्यासक्रमात तणावमुक्तीच्या सहज आणि सोप्या आध्यात्मिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, मन कोणत्याही परिस्थितीत शांत आणि समतोल राहण्यासाठीचे उपाय शिकविले जातात. अशा प्रकारे हा अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर आयुष्यभर तणावमुक्त राहणे शक्य होते, असे या संग्रहालयाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.