संकट निवारणासाठी रहा सज्ज!
आपत्तीनंतर नुकसानी कमी होण्यास प्रयत्नशील रहावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अधिकाऱ्यांना सूचना
पणजी : पावसाळ्यात कोठेही कोणतेही नैसर्गिक संकट आल्यास ती तक्रार निवारणासाठी प्रत्येक सरकारी खात्यात समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असा आदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. पर्वरी येथील मंत्रालयात काल सोमवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी आपत्ती निवारणासंबंधी आढावा घेतला. या बैठकीला महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार, दक्षिण आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांखकाम खात्याचे प्रमुख अधिकारी, वीज खात्याचे प्रमुख अधिकारी, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, किनारी क्षेत्रातील भारतीय नौदलाचे अधिकारी, मुख्य वन संरक्षक आदी उपस्थित होते.
... तर धोकादायक बांधकामे मोडा
सार्वजनिक बांधकाम खात्याने मान्सूनपूर्व कामे करताना धोकादायक झाडे, इमारती तसेच अनेक ठिकाणच्या गंभीर ठिकाणांची दुऊस्ती करावी. धोकादायक बांधकामे उपाययोजना करण्याच्या परिस्थितीत नसल्यास, तसेच आवश्यकता भासल्यास ती धोकादायक बांधकामे मोडण्याची सूचनाही मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.
पंचायती, पालिकांना निधीपुरवठा
मान्सूनपूर्व कामांसाठी पंचायतींना प्रत्येकी 35 हजार ऊपये, तर पालिकांना 60 हजार (ब गटातील) व 1 लाख 10 हजार ऊपयांचा (अ गटातील) निधी दिला जाईल, त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातही आपत्ती परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मोठा परिणाम होणार नाही, याची दक्षता पालिका आणि पंचायतींनीही घ्यावी, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
नद्यांतील गाळ आतापासून उपसा
पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून नद्यातील गाळ उपसण्यास आतापासूनच सुरुवात करावी, असे मुख्यमंत्री सावंत यांनी जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास वा आपत्ती आल्यास नुकसान कमी होण्यासाठी सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दुर्घटना घडल्यास यावर साधा संपर्क...
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती घडल्यास व दुर्घटना झाल्यास भ्रमणध्वनी (मोबाईल) यावरून आपत्ती निवारण कक्षाला संपर्क साधायचा झाल्यास प्रथम 0832 हा कोड डायल करून नंतर 112 या क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. 0832 या कोडशिवाय कॉल केल्यास संपर्क होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.