कारावास होवो किंवा फाशी; मायदेशी परतणारच!
शेख हसीना यांची घोषणा; दोन वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर भाष्य, युनूस सरकारवर आरोप
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच जाहीर भाषणात मायदेशी परतण्याची घोषणा केली. काहीही झाले तरी आपण बांगलादेशला परत येऊ, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांचे पुत्र साजीब वाजेद यांनी युनूस सरकार, संयुक्त राष्ट्रांचा अहवाल आणि कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन वर्षांनंतर बुधवारी व्हर्च्युअल पद्धतीने जनतेला संबोधित केले. त्यांच्या 25 मिनिटांच्या भाषणादरम्यान त्यांचा कॅमेरा बंद होता.
मी स्वत:च्या इच्छेने बांगलादेश सोडले नाही. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा नेत असताना त्यांच्याकडे निघण्यासाठी फक्त 30 ते 40 मिनिटे होती. आपण देश सोडून जात आहोत हे त्यांना माहीत नव्हते. त्या त्यांच्या मूळ गावी, तुंगीपारा येथे जाण्याच्या तयारीत होत्या, पण परिस्थितीने मला देशाबाहेर जाण्यास भाग पाडले, असा दावा हसीना यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.
बांगलादेशच्या माजी पदच्युत पंतप्रधान आणि आवामी लीगच्या अध्यक्षा, शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यापासून पहिल्यांदाच एक मोठा राजकीय जाहीर संदेश दिला. नवी दिल्लीत एका आभासी कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मला देशापासून दूर राहण्यास भाग पाडले गेले, परंतु त्या बांगलादेशच्या लोकांपासून कधीही वेगळ्या झाल्या नाहीत. आता काहीही झाले तरी मी मायदेशी परत जाईन. सरकारने जरी मला तुरुंगात टाकले किंवा ठार मारले तरी, लोकांप्रति असलेले आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी बांगलादेशात परतणारच, असे त्यांनी निर्धाराने सांगितले.
आपल्या भाषणात, हसीना यांनी बांगलादेशच्या सध्याच्या सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. जुलै-ऑगस्ट 2024 मधील आंदोलन हे सुरुवातीपासूनच एक शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन नव्हते, तर त्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्याच्या मोहिमेत रूपांतरित केले गेले होते, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनाच्या नावाखाली संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या सरकारने हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एक न्यायिक आयोग स्थापन केला होता, परंतु सत्तांतरानंतर अंतरिम सरकारने चौकशी थांबवली, असे त्यांनी म्हटले आहे.
युनूस सरकारवर आरोप
अंतरिम सरकारने हिंसाचारात सामील असलेल्यांना कायदेशीर संरक्षण देऊन न्यायिक प्रक्रिया कमकुवत केली. पोलिसांची हत्या करणाऱ्यांनाही संरक्षण मिळाले. जर सरकारला सत्य उघड करायचे असते, तर त्यांनी त्यांच्या सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाला काम करू दिले असते. अल्पसंख्याक, न्यायाधीश, पत्रकार, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. देशातील कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत झाली आहे आणि लोकशाही संस्था दबावाखाली आहेत, असे अनेक आरोप हसीना यांनी केले.
पुत्र साजीब वाजेद यांच्याकडून मोदी सरकारचे आभार
शेख हसीना यांचे पुत्र आणि माजी आयसीटी सल्लागार, साजीब वाजेद यांनी 2024 च्या आंदोलनातील मृतांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रांनी 1,400 मृत्यूंची नोंद केली आहे, तर अधिकृत आकडेवारी सुमारे 800 असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचवेळी साजीब वाजेद यांनी भारत सरकारचे आभार व्यक्त केले. शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यानंतर भारताने त्यांना राष्ट्रप्रमुखाप्रमाणे वागणूक दिली. त्यांनी आपल्या आईला सन्मान, सुरक्षा आणि सर्व आवश्यक सुविधा पुरवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आभार मानले. त्यांनी याला दोन्ही देशांमधील संबंधांचे एक सकारात्मक चिन्ह असे म्हटले.