For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रसन्न पाडवा!

06:58 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रसन्न पाडवा
Advertisement

गुढीपाडव्याचा आजचा मंगल दिवस. सृष्टीने नवचैतन्य प्राप्त करावे आणि पशुपक्ष्यांनी आनंदाची गाणी गात संपूर्ण जगाला आनंदित करावे असा हा काळ. आयुष्यातील बऱ्या-वाईट आठवणींचे मिश्रण एकत्र करून त्यांचा मनोभावे स्वीकार करायचा आणि पुढची वाट चालायला लागायचे अशी शिकवण देणारा चैतन्यदायी सण. रोजच्या आव्हानांना थोडेसे बाजूला ठेवून आनंदाने काही क्षण साजरे करावेत असे विचार मनात यावेत, सृष्टीकडे नजर भिरभिरू लागली तर त्या नजरेला कोवळी सृष्टी पडावी अशी व्यवस्था म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. चैत्राची पालवी फुटली म्हणजे सृष्टीवर आनंदाची उधळण सुरू झाली. पानगळीची जागा नव्या पानांनी घेतली असे प्रतिवर्षी घडत असते. जग प्रत्येकवर्षी नवे घडत असते. नवे रूप घेत असते. या रुपाला भाळलेले लोक सृष्टीचे हे अनोखे रूप आपल्या मनात साठवण्यासाठी सज्ज होऊ लागतात असा हा काळ. पुढे वैशाख आहे म्हणून कोणी चैत्र साजरा करायचे थांबत नाही. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण पुढे येणार आहे, सृष्टी आपले आणखी निराळे रूप दाखविणार आहे याची खात्री आपले मन आपल्याला देत असते. निसर्गाने बहाल केलेली ही सकारात्मकता हे प्रत्येक जीवाचे संचित आहे. हेही दिवस जातील या विशाल दृष्टिकोनाचा विचार मनामनात पेरत, निसर्ग आपले रूप पालटत असतो. मानवाच्या नकळत त्याच्या रूपाचे रंग तो मानवाच्या अंतरंगात देखील उधळत असतो. म्हणूनच फुललेल्या फुलांनी मन प्रसन्न होते की सुगंधाने याचा विचार करत न बसता मनुष्य आधी त्याचा आस्वाद घेतो. तो सुगंध आपल्या अंतरी साठवतो आणि नंतर त्याचा विचार करतो. त्याच्याही नकळत हा आनंद त्याच्या मनात रुंजी घालू लागतो, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची उधळण करू लागतो. फुलाप्रमाणे त्याचा चेहरा फुलतो, सुगंधित मन त्याच्या शरीराचा ताबा घेते आणि त्याच्या वर्तनातून त्या आनंदाची अनुभूती येऊ लागते. निसर्ग असा अनेकांगाने माणसाच्या वर्तनाचे नियंत्रण करतो. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होत असताना त्याची त्रासिक मुद्रा जशी त्याची स्थिती सांगते तसेच पावसाच्या एका शिडकाव्याने सुखावलेले त्याचे शरीर हास्याची लकेर त्याच्या तनामनावर गारूड करताना दिसते. हे अलौकिक आहे. सहजावरी ध्यानात येत नाही. मात्र एकांतात जेव्हा ही अनुभूती येते तेव्हा अशा अनेक घटना आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. व्यक्ती त्या आठवणींशी पाठशिवणीचा खेळ खेळू लागतो. काळाचा पट मागे पुढे झोके घेऊ लागतो. पूर्वी घडलेल्या घटना, त्याचे परिणाम, त्यातील आनंद, दु:ख, कारुण्य सारे सारे समोर येऊन उभे राहते. मागे गेलेल्या काळाची कधी हळहळ वाटून जाते तर कधी दु:खाचा डोंगर पार केल्याचा आनंद उत्साह वाढवू लागतो. आपण असे होतो, तसे होतो, असे झालो आणि असे वागलो या साऱ्या शाश्वताची आणि सत्याची ग्वाही नकळत आपले मन देऊन जाते. कधीकाळी आपण नाकारलेल्या आपल्याच कृतीला आपण खट्याळपणाने हसून मनातल्या मनात मान्य करतो. कधी झालेल्या चुकीने चडफडतो, तडफडतो. आपल्याच मनाने आपल्या बाजूच्या आणि विरोधातल्या विचाराला देखील मान्यता देऊन जातो. निसर्ग असा सर्वार्थाने आपल्याला आपल्याच समोर उभा करतो. आपले सुंदर रूप, आपली कुरूपता, आपले मोठेपण आणि कोतेपण देखील आपण आपल्याच मनात मान्य करतो. एखादा दर्पण हळुवारपणे आपल्याला आपल्याच समोर उभे करतो आणि आपण आपल्याच त्या रुपाच्या प्रेमात पडतो. जसा मी आहे, तो असा आहे आणि माझा मला मी प्रिय आहे! हे त्रिकालाबाधित सत्य आपल्यासमोर सर्व गुन्हे माफ करून निर्दोष म्हणून उभे करते. पूर्वीच्या चुकांमधून सुटका करून नव्याने त्याच चुका न करण्याची ग्वाही घेऊन पुन्हा नव्याने जगायला मुक्त करते. सृष्टीचा हा पाडवा आपल्या आयुष्यातही रोज नवे बदल घडवत असतो. त्यासाठी असा एक क्षण पुरेसा ठरतो की, जेव्हा आपण आपल्या मनाचे होतो. नितळपणाने आपल्यासमोर पाहत असतो. मनाच्या खोल अंधारातून उगवतीच्या दिशेने आपण धावतो. या धावण्याला ना पाय धडधाकट, ना शक्तीची गरज पडते. मनाच्या भराऱ्या त्यासाठी पुरेशा ठरतात. मन आपल्याला आनंदाची, सत्याची अनुभूती देते आणि नव्याने पालवी फुटलेल्या पानासारखे ते कोवळे पान बनून जाते. वाढते वय या पानावरील रेषांचे म्हणणे जाणून असते. ते जितके व्यवहारी, तितकेच ममत्व बाळगणारेदेखील बनते. सोबतीच्या माणसांची सुटलेली साथ, नाराज होऊन गेलेल्या आपल्यांचा हात तेव्हा दूरवरून खुणावू लागतो. ज्याच्या मनाने अहंकाराला मागे टाकले तो त्या सुटलेल्या हाताला पुन्हा शोधून घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग त्याला इथेही मोकळा होण्याचा सल्ला देतो. जो मानतो तो सुखाची अनुभूती घेतो. जो सोडतो तो तसाच कुढत बसतो. हा खेळ आयुष्यभर सुरू राहतो. निसर्ग वर्षाला आपली ही चूक सुधारतो. मनुष्य अशा संधीची वाट शोधत राहतो. कधी निसर्गाच्या सानिध्यात ती वाट सहज मिळेल, त्याला त्याच्या इच्छित किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जाईल. तिथल्या त्याच्या प्रियजनांना त्याच्यासोबत घेऊन येईल यावर त्याचाच विश्वास नसतो. त्यामुळेच तो या सुखापासुन नेहमीच दूर पळू लागतो. कधी एखाद्या शांत सकाळी झाडांच्या पानांची सळसळ ऐकत शांत बसावे, नदीच्या काठाला बसून धावत्या जलाचे खेळ पहावे, समुद्राच्या लाटांच्या आवाजात स्वत:चा तळ शोधावा, खोल विहिरीत हळूच शिरून तिथल्या शांततेला अनुभवावे हे असे करणे बाल्यावस्थेचे नव्हे जिवंतपणाचे लक्षण आहे. माणूस जिवंत आहे, ताजा टवटवीत आहे आणि जगाच्या आरंभापासून ज्या शांततेने माणसाला एक चैतन्य बहाल केले त्या चैतन्याशी तो स्वत:ला जोडू पाहत आहे हा विचारही खूप आनंददायी आहे. या आनंदाला काही खर्च येतच असेल तर तो स्वत:साठी दिलेला वेळ हा आहे. तेवढा खर्च हल्ली बऱ्याच लोकांना परवडत नाही. स्वत:कडे जाण्याचा रस्ता त्यांना सापडत नाही. कदाचित ती वाट खूप मागे राहिली आणि आपण खूप पुढे आलो असे प्रत्येक वयातील व्यक्तीला वाटत असावे. प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे. सृष्टी एक चक्र बनून प्रत्येकवर्षी स्वत:ला भेटते. स्वत:तील नाविन्य जगाला दाखवते. विशेष म्हणजे त्यात प्रत्येकाला गुरफटायचे असते. तेच तर तिचे निमंत्रण असते. या, माझ्यात समरसून जा. नव्याने स्वत:ला अनुभवत रहा, स्वत: नवे नवे होत रहा. सृष्टीने आजही ते निमंत्रण धाडले आहे. गुढीच्या उभारणीनंतर काहीकाळ या निमंत्रणाचा स्वीकार प्रत्येकाने केला तर आयुष्याची पालवीदेखील अनुभवायला येईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.