कृतिशील व्हा; संधिवात नियंत्रित करा
जागतिक संधिवात नियंत्रण दिन विशेष
मनीषा सुभेदार /बेळगाव
आपण सर्व कामे संपवून निवांतपणे झोपी जातो. सकाळी आपण उठणार तोच आपल्या लक्षात येते की आपले स्नायू ताठ झाले आहेत. हाताची बोटे ताठ झाली असून हाताची मूठ करता येत नाही. आपल्याला कुशीवर वळता येत नाही. आपल्या लक्षात येत नाही की नेमके काय झाले आहे? अशी लक्षणे जेव्हा आढळतात तेव्हा समजून घ्यायला हवे की आपल्याला संधिवात सुरू झाला आहे. संधिवात आणि हाडांचे दुखणे यात खूप फरक आहे. मात्र, बऱ्याचदा याची गल्लत केली जाते. याच पार्श्वभूमीवर जागतिक संधिवात दिन नियंत्रणाच्या निमित्ताने बेळगावमध्ये ज्यांनी सर्वप्रथम संधिवात रोगतज्ञ म्हणून प्रॅक्टीस सुरू केली त्या डॉ. अर्चना उप्पीन यांची घेतलेली ही मुलाखत...
►संधिवात म्हणजे काय?
►सांध्यांमध्ये वेदना होणे किंवा सूज येणे, त्याला संधिवात म्हणतात. वैद्यकीय परिभाषेत त्याला ऑर्थरायटिस असे म्हटले जाते. आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांना घासण्यापासून सुरक्षितता देतो. मात्र, संधिवातामध्ये सांध्यांमधील या द्रव पदार्थाचे प्रमाण कमी होत जाते आणि सांधे क्षीण होऊ लागतात. ते सतत एकमेकांवर घासल्यामुळे सूज येते आणि त्यांची ताठरता वाढते.
►संधिवाताचे किती प्रकार आहेत? कोणत्या वयोगटात हा आजार होऊ शकतो?
►तसे पाहिल्यास संधिवाताचे 100 हून अधिक प्रकार आहेत. परंतु भारतामध्ये सामान्यत: ‘ऑस्टिओ ऑर्थरायटिस व ऱ्हुमेटाईड ऑर्थरायटिस’ याचे प्रमाण अधिक आहे. ऱ्हुमेटाईड ऑर्थरायटिसमध्ये शरीरातील अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सकाळी सांध्यांमध्ये ताठरता जाणवते तर ‘ऑस्टिओ ऑर्थरायटिस’मध्ये वाढते वय, शरीराची हालचाल आणि शरीराची होणारी झीज कारणीभूत ठरते. आपले गुडघे शरीराचे संपूर्ण वजन पेलतात. सांध्यांची झीज झाल्याने गुडघ्यांना सर्वाधिक त्रास होऊ शकतो.
►संधिवात फक्त वृद्धपणीच होतो का?
►नाही. संधिवात होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. 20 ते 40 वयोगटातही तो होऊ शकतो. तरुणांना जो संधिवात होतो त्यामुळे डोळे, यकृत, किडनी यांनाही इजा पोहोचू शकते.
►संधिवात का होतो?
►याचे नेमके असे कारण सांगता येणार नाही. पण महिलांमध्ये इस्ट्रोजन हार्मोनमुळे संधिवात होतो. तसेच ज्यांचे मौखिक आरोग्य चांगले नाही, जे प्रदूषित वातावरणात काम करतात त्यांनासुद्धा संधिवात होऊ शकतो. कधी कधी संधिवात आनुवंशिकही असतो.
►संधिवाताची लक्षणे कोणती?
►संधिवाताच्या प्रकारानुसार त्याची लक्षणे आढळतात. परंतु सांधेदुखी, सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता, सांध्यांना सूज येणे, हालचाल करण्यामध्ये अडथळा येणे, ही संधिवाताची लक्षणे आहेत. तसेच थकवा येणे, ताप येणे, भुकेची जाणीव कमी होणे, हीसुद्धा लक्षणे आहेत. दुखणे वाढत गेल्यास नैराश्यही येऊ शकते.
►यावर इलाज काय?
►जितक्या लवकर आपण डॉक्टरांना जाऊन दाखवू तितक्या लवकर संधिवात नियंत्रणात येऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. एकदा संधिवात झाला तर तो पूर्णत: बरा होईल, असे नाही. मात्र, त्यावर नियंत्रण नक्की मिळविता येते. महत्त्वाचे म्हणजे संधिवातावर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडेच जाणे हे महत्त्वाचे आहे. संधिवाताची सुरुवात झाली असेल तर अत्यंत साध्या व कमी खर्चाच्या चाचण्यांद्वारे तपासणी करून उपचार सुरू करता येतात. मात्र, विलंब लावल्यास कधीकधी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.
►संधिवाताच्या रुग्णांचा आहार कसा असावा?
►शक्यतो ‘प्रोसेस्ड फुड व रेड मीट’ टाळावे. लोकांना असे वाटते की, संधिवात किंवा संधिवातामध्ये बटाटा, वांगी खाऊ का? असे रुग्ण हमखास विचारतात. मात्र, संधिवातामध्ये वांगी खाणे हितकारक ठरते. बटाटासुद्धा चालतो. मुख्य म्हणजे इंद्रधनुषी आहार असावा. याचाच अर्थ रंगीबेरंगी भाज्या, फळे आवर्जुन खावीत.
►संधिवाताचा रुग्ण दैनंदिन जीवन सहजपणे जगू शकतो का?
►निश्चितच जगू शकतो. लक्षणे जाणवताच संधिवातावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क करणे, वेळेवर औषधे घेणे, व्यायाम आणि आहार याबाबतच्या सूचनांचे पालन केल्यास रुग्ण सहजपणे जगू शकतो. मुख्य म्हणजे रात्रीचे जेवण शक्यतो 7 पर्यंत करावे. रात्रीच्या जेवणासाठी उशीर करू नये. रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा पहिला चहा यामध्ये किमान 12 तासांचे अंतर असायला हवे. केवळ संधिवाताच्याच रुग्णांसाठी नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी या नियमांचे पालन करावे.
►आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण कोणता सल्ला द्याल?
►यावर्षीचे संधिवात दिनाचे घोषवाक्य ‘ग्t’s ग्ह ब्दल्r प्aह्, ऊaव aम्tग्दह’ असे आहे. याचाच अर्थ हा विकार होऊ नये यासाठी प्रथमपासूनच काळजी घेणे आणि जर संधिवात सुरू झाला असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. संधिवात पूर्णत: बरा होत नाही, पण काळजीचे कारण नाही. योग्य औषधोपचार आणि पथ्य-पाणी यामुळे तो नियंत्रित करता येतो. हाडांचे दुखणे आणि संधिवाताचे दुखणे वेगवेगळे आहे, हे रुग्णांनी लक्षात घ्यायला हवे.
- भारतात 15 टक्के लोकांना म्हणजेच 180 दशलक्ष लोकांना संधिवाताने ग्रासले आहे.
- जगभरात 60 वर्षांवरील 18 टक्के महिलांमध्ये संधिवाताची लक्षणे आहेत
- संधिवाताची लक्षणे असलेल्या पुरुषांचे प्रमाण 9.6 टक्के आहे.
- महिलांमध्ये मासिकपाळी, गर्भावस्था व मोनोपॉज यामुळे हार्मोन्सची पातळी सतत बदलत असते. त्याचा परिणाम सांध्यांवर होतो.
डॉ. अर्चना उप्पीन या बेळगावच्याच पूर्वाश्रमीच्या अर्चना खनगावी. त्यांनी जेएनएमसीमधून एमबीबीएसची पदवी घेतली. विजापूरच्या गव्हर्न्मेंट जनरल मेडिकल कॉलेजमधून एमडी ही पदवी घेतली. मणिपाल हॉस्पिटल बेंगळूर येथून संधिवात या विषयावर त्यांनी फेलोशिप पूर्ण केली. शिवाय रुमेटॉलॉजीवर युरोपियन अभ्यासक्रमही केला आहे. दहा वर्षांपासून त्या बेळगावमध्ये प्रॅक्टीस करत असून बेळगावमधील संधिवातावर उपचार करणाऱ्या पहिल्या डॉक्टर आहेत.
पत्ता
उप्पीन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड ऑर्थरायटिस (रुमेटॉलॉजी) सेंटर, सदाशिवनगर, बेळगाव.
फोन क्र.-07829371795