स्मार्टफोनच्या आवरणाविषयी दक्ष रहा
अलिकडच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. त्याच्यावाचून आपले पावलोपावली अडते. शिवाय स्मार्टफोन असणे हे प्रतिष्ठेचेही लक्षण बनले आहे. त्यामुळे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांकडे तो असतो. स्मार्टफोन महाग असतो. त्यामुळे त्याचे योग्य प्रकारे संरक्षण व्हावे म्हणून त्यावर आवरण किंवा कव्हर घातले जाते. तथापि, हे आवरण आपल्या आरोग्यासाठी एक समस्या बनत आहे, याची जाणीव बहुतेकांना नसते. या आवरणामुळे माणसाला कोणत्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, यावर संशोधन केले जात आहे.
या आवरणात आपला स्मार्टफोन सुरक्षित राहतो, पण कालांतराने या आवरणावरच धुळीचे थर जमा होतात. त्यावर घातक अशा जीवाणूंची वाढ होते. आपण या आवरणासह जेव्हा स्मार्टफोन हाती घेतो, तेव्हा हे जीवाणू आपल्या हाताच्या तळव्याला चिकटतात आणि आपल्या तोंडात किंवा नाकातून आपल्या श्वसनसंस्थेत प्रवेश करु शकतात. अशा प्रकारे ही आवरणे रोगप्रसाराचे एक माध्यम बनली आहेत, असा इशारा अनेक तज्ञांनी लोकांना दिला आहे.
यावर उपाय म्हणजे ही आवरणे वेळोवेळी स्वच्छ करणे हाच आहे. नेमक्या याच बाबीकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात. हे आवरण शक्य असेल तर साबणाने आणि पाण्याने धुणे, टुथपेस्टचा उपयोग करुन त्यावरचे डाग घालविणे, बेकिंग सोडा आणि पाणी यांच्या मिश्रणाचा उपयोग करुन स्वच्छता करणे, अल्कोहोलचा उपयोग करणे, आदी उपायांनी हे आवरण किंवा कव्हर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सूचना तज्ञांनी केली आहे. अन्यथा आपले आरोग्य संकटात येण्याची शक्यता आहे.