For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्त्यावर कचरा टाकाल तर खबरदार..!

06:58 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्त्यावर कचरा टाकाल तर खबरदार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : दंड करण्याबरोबरच वाहनही जप्त करणार

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्य सरकार कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे. मात्र आजही काही लोक रस्त्यावर कचरा टाकतात. असे प्रकार आता सरकार खपवून घेणार नसून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला मोठा दंड करून त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, अशा इशारा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

Advertisement

काल शनिवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यभरातील पंच, सरपंचांना ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची ऑनलाईन पद्धतीने माहिती दिली. यावेळी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचे लाड न करता त्यांचे प्रकार थांबविण्यासाठी त्यांच्यावर दंडाची कारवाई करा, अशी सूचनाही मुख्यमंत्री सावंत यांनी पंच व सरपंच यांना दिली आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने विविध प्रकल्प उभे केले आहेत. या दर्जेदार प्रकल्पांची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. पंचायत, पालिकांतर्फे घरोघरी जाऊन कचरा उचल केली जाते. असे असले तरी काही लोकांची मानसिकता अजूनही बदलत नाही. असे लोक रात्री हळूच पिशवीत कचरा भरून रस्त्यावर टाकत आहेत. याविरोधात आता कडक कारवाई केली जाईल. याबाबत मी पोलीस खात्याला आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार

रस्त्यावर कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास त्याचे छायाचित्र काढून पोलिसांत तक्रार द्यावी. यापुढे अशा व्यक्तींना मोठा दंड द्यावा लागणार आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान पंचायत, पालिकांनी विशेष मोहीम राबवून घराघरातील रद्दी, जुने फर्निचर आणि अन्य टाकावू वस्तू गोळा कराव्यात. हा कचरा विकून मिळालेले पैसे कचरा वेचक कामगारांच्या कल्याणासाठी वापरावेत. पंच,सरपंच,नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारी कार्यालयातील कचरा हटवण्याचे निर्देश संबंधितांना दिलेले आहेत. यामध्ये सर्वात स्वच्छ आणि नीटनेटके असणाऱ्या तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांना बक्षीस देण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कंत्राटदारांची नोंदणी आवश्यक

राज्यात हॉटेलमधील, औद्योगिक वसाहत किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदारांनी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे मंडळाला कचरा कुठून आला, कुठे गेला त्याची विल्हेवाट कशी लावली इत्यादी माहिती गोळा करता येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.