विषयांच्या नादाला लागलेल्याने वेळीच सावध होऊन मागे फिरावे
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले, आत्मसुखाची गोडी चाखलेल्या आत्मज्ञानी माणसाला बाह्य गोष्टीत गोडी वाटत नाही. तो ब्रह्माशी समरस होऊन अक्षय्य सुखाचा अनुभव घेत असतो. जेव्हा एखादी मोठी गोष्ट मिळते तेव्हा लहान गोष्टीचे महात्म्य आपोआपच संपुष्टात येते. तो ब्रह्माचा अंश असून सध्या जगत असलेले जीवन ही त्याची तात्पुरती अवस्था आहे, हे त्याच्या लक्षात आलेले असते. साहजिकच सध्याच्या जीवनात मिळणाऱ्या इंद्रीयसुखाच्या आनंदाची त्याला कधीच मात्तबरी वाटत नाही. त्यामुळे त्याला विषयसेवनात कधीच गोडी वाटत नाही. त्याला उत्कृष्ट तेच मिळाले असल्याने आणि कायम मिळत राहण्याची खात्री असल्याने त्यापुढे गौण असलेले विषयसुख ज्याला मिळाले आहे त्याच्याबद्दल त्याला द्वेष किंवा मत्सरही वाटत नाही.
भगवंत पुढे म्हणाले, ह्या विषयसुखाच्या नादी लागून लोक कसे नागवले जातात ते मी तुला पुढील श्लोकात सांगतो. जे विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग भोगायला उत्सुक असतात त्यांना नेहमीच दु:ख प्राप्त होते. म्हणून ज्ञानी पुरुष त्यांच्या नादाला लागत नाहीत.
विषयातील जे भोग ते दु:खास चि कारण । येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे ।। 22 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष चांगले जेवण मिळणे खिशाला परवडत नसल्याने, नाईलाजाने कोंड्यासारख्या अगदी कमी किमतीच्या अन्नावर गुजराण करत असतो, त्याप्रमाणे दुर्मीळ असे आत्मस्वरूप अनुभवायला न मिळालेलाच विषयात रंगतो. हे म्हणजे मृगजळाने तहान भागवण्याचा प्रयत्न करण्यासारखेच असते. मुळात मृगजळच खोटे त्यामुळे त्यातून तहान भागणे अशक्य! त्याप्रमाणे विषयातून मिळणारे सुख हे तात्पुरते असल्याने त्यातून समाधान मिळणे अशक्यच असते. तहानेने त्रस्त झालेली हरणे मृगजळात पाणी आहे असे समजून त्याचा पाठलाग करत माळरानावर जाऊन पोहोचतात.
तेथे जाऊन प्यायला पाणी न मिळाल्याने ऊर फुटून मरण पावतात. त्याप्रमाणे ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नसतो, त्यालाच विषयात सुख आहे असे वाटते. आकाशातील वीज कितीही शक्तिशाली असली तरी त्यातून उजेड कधीच मिळत नाही, त्याप्रमाणे विषयातून कायम टिकणारे सुख मिळणे शक्य नसते. वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची घरे बांधण्याचा खटाटोप कुणी केला असता का? अर्जुना तूच विचार करून बघ.
ज्याप्रमाणे विषाच्या चवीला कोणी मधुर म्हणू लागला तर त्याला लोक खुळ्यात काढतील त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जो म्हणतो त्याला ज्ञानी पुरुष खुळ्यात काढतात. पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, त्याला जरी पुत्र म्हंटले असले तरी पृथ्वीवरील लोकांना तो नेहमीच पिडत असतो. तसेच मृगजळ ह्या शब्दात जळ अशी अक्षरे आहेत पण त्यात पाण्याचा अंशही नसल्याने मृगजळाने तहान भागणे कधीच शक्य नसते. त्याप्रमाणे विषयसुख ह्यात सुख हा शब्द जरी असला तरी त्यापासून सुख मिळते असे म्हणणे व्यर्थ आहे. सर्पाच्या फणेची सावली उंदराला कितपत शांती देईल ह्याचा विचार करून पहा. अर्जुना, गळाला लावलेल्या अमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक. त्याप्रमाणे विषयांचा संग हे अमिषच आहे हे लक्षात घे. एकदा त्याची चटक लागली की, ती माणसाचा जीव घेतल्यावाचून रहात नाही.