For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा !

06:12 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा
Advertisement

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ! असे ब्रिदवाक्य काही अधिकारी-कर्मचारी मानाने मिरवित आहेत. पैशासाठी खुलेआम जनतेची पिळवणूक सुऊ असून पैसा फेको काम देखो अशी देहबोली मंत्रालय आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहे. आपण जे करतोय तीच पुर्व दिशा असल्याचे वागत या अधिकाऱ्यांनी जनाची तर नाहीच नाही मात्र मनाची देखील लाज सोडली आहे.

Advertisement

जनतेच्या खिशातून टॅक्स स्वऊपात मिळणाऱ्या रकमेतून सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. जनतेच्या खिशाला झळ बसत या अधिकारी-कर्मचाऱ्यांची घरे चालत असताना देखील काही मुजोर अधिकारी-कर्मचारी आपल्या पदाचा दुरोपयोग करीत जनतेकडून भीक स्वऊपात लाच मागत आहेत. लाच नाही दिली तर सरकारी नियम आणि कायद्याखाली जनतेची पिळवणूक ठरलेली असते. मात्र या लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना एक समजत नाही ज्या जनतेच्या जीवावर आपले कुटुंब चालत आहे. त्याच जनतेची आपण पुन्हा एकदा पैशासाठी पिळवणूक करीत आहोत. मात्र या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची देखील लाज सोडल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालय आणि पोलीस ठाण्यात रेड हँण्ड लाच घेणाऱ्या लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सामान्य जनतेला वेठीस ठेवत पैशासाठी त्यांचा तळतळाट घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे गेल्या पंधरा दिवसांत आढळून आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ऊर्फ राजू ढेरंगे या

Advertisement

लिपिकाला मंत्रालयातीलच दुसऱ्या मजल्यावर अगदी खुलेआम 35 हजारांची लाच स्वीकारताना गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तर गेल्या आठवड्यात कुरार पोलीस ठाण्यातच एसीबीने

ट्रॅप लावत वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 3 लाखांची लाच घेताना अटक केली. एकापाठोपाठ एक अशा घटना घडल्याने पैशाशिवाय कामे होत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेही पैसे कोणाचे? कोणा-धणधांडग्याचे नाहीत तर गोरगरिबांचे आहेत. मात्र गेंड्यांच्या कातडीचे असलेल्यांना याचे काही एक नाही. कारण ते मढ्याच्या टाळूवरचे लोणी देखील खातील अशी ही औलाद आहे. हे काही पहिल्यांदा घडले नाही. मंत्रालय म्हणजे राज्याचा रहाटगाडा ज्या मंदिरातून चालतो त्याला मंत्रालय म्हणतात. कारण येथूनच सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. मात्र या पवित्र स्थानालाच अपवित्रतेतची किनार दिली जात आहे. ही घटना काही प्रथमच मंत्रालयात घडली नाही. तर यापूर्वी देखील म्हणजे 13 वर्षांपूर्वी नगरविकास खात्याचा उपसचिव आनंदराव जीवने यास लाच घेताना मंत्रालयातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अॅण्टी करप्शनने तत्काळ त्याच्या घरी धाड घातली असता तेथे 80 लाखांची रोकड सापडली होती. 2016 साली तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पी. ए. गजमल ऊर्फ गजानन पाटील यास अॅण्टी करप्शनने 30 कोटी ऊपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मंत्रालयातूनच अटक केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांचा जो काही पडता काळ सुरू झाला. त्यातून ते काही सावरले नाहीत. त्यांना आपले मंत्रीपदही गमवावे लागले. मात्र ही कारवाई पूर्ण निष्पक्ष असून, वेळ पडली तर अॅण्टी करप्शन माझ्या देखील कार्यालयाची केव्हाही झडती घेऊ शकते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांचा खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यासाठी राजेंद्र ढेरंगे याने 50 हजारांची लाच मागितली होती. बरे ही लाच मागितली कोणाकडे ज्याचे वडाळ्याला छोटे मेडिकल दुकान आहे त्याच्याकडे. काही नियमांवर बोट ठेवून किंवा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाने 12 दिवस दुकान बंद ठेवले. यावेळी त्याने विनंती केली असता रामदास गाडे यांनी ही विनंती धुडकावून लावत राजू ढेंरगेच्या मार्फत लाचेची मागणी केली. मात्र  या दुकानदाराने सरळ याची माहिती एसीबीला दिली. त्यानुसार, एसीबीने मंत्रालयात ‘ट्रॅप‘ लावला परंतू गाडे हा दिल्लीला असल्याने राजू ढेरंगे एसीबीच्या कचाट्यात सापडला. ज्यावेळी सामान्य जनतेच्या सहनशिलतेचा अंत होतो त्यावेळी ते न्यायासाठी कोणतेही पाऊल उचलात, हे या उदाहरणाने स्पषट केले. तर दुसऱ्या घटनेत एसीबीने कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना अटक केली. ज्ञानेश्वर तावडे यांची आत्तापर्यंतची कारकीर्द पाहिली तर तशी कर्तव्यनिष्ठ अशी आहे. मात्र ज्ञानेश्वर जुन्ने या पोलीस अधिकाऱ्यावर अनेकदा लाचखोरीचे आरोप झाले आहेत. तरी देखील या अधिकाऱ्याच्या नादी लागत वरिष्ठ असलेल्या तावडे यांच्या कारकिर्दीला गालबोट लागले. वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या गळाला लागणे ही काही पहिलीच घटना नाही. तर यापुर्वी वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांना देखील एसीबीने अटक केली आहे. पोलीस दलातील शेवटचे दिवस राहिलेत आत्ता नाही कमावले तर कधी कमाविणार या मानसिकतेत हे अधिकारी असतात. अशातच ते स्वत: स्वत:चा घात कऊन घेतात. मात्र हे कमाविताना ते कोणाचा ना कोणाचा तरी तळतळाट घेत असतात.

गेल्या वर्षी लोकसेवकांनी कमावलेल्या बेकादेशीर मालमत्तेची चौकशी करून अॅण्टी करप्शनने 988 व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. त्यात 188 खासगी व्यक्ती आहेत. त्यामुळे य्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रेटकार्ड समोर येईल. देशात पंतप्रधान मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अशा भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यास सुऊवात केली असताना देखील अद्याप काही अधिकारी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असे मानतात.

गेल्या वर्षभरात अनेक पोलीस अधिकारी तसेच मंत्रालयातील कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. अगदी पोलीस ठाण्याचे बोलायचे झाले तर यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लाच घेताना अगदी क्वचित पकडले जायचे. मात्र सद्य परिस्थिती पाहता लाचेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची रांग लागली आहे. तर दुसरीकडे मंत्रालयात लाच घेताना खुप कमी घटना घडायच्या. मात्र आता सरकारी बाबु देखील यामध्ये कमी नसल्याने, यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Advertisement
Tags :

.