रायन टेन डुशेट, टी. दिलीप यांना बीसीसीआयचा भावनिक निरोप
भारतीय क्रिकेटमधील योगदानाचा गौरव
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डुशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष आभार मानत त्यांना भावपूर्ण निरोप दिला. संघाच्या यशामागील त्यांच्या समर्पण, व्यावसायिकता आणि पडद्यामागील अथक परिश्र्रमांचे बीसीसीआयने कौतुक केले.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ’एक्स’ खात्यावरून संदेश प्रसिद्ध करत म्हटले, ‘सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डुशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी टीम इंडियासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तुमचे समर्पण, व्यावसायिकता आणि पडद्यामागील अथक परिश्र्रम संघाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. तुमच्या आगामी कारकिर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.’
टी. दिलीप यांनी बदलली भारतीय संघाची क्षेत्ररक्षण संस्कृती
टी. दिलीप यांनी 2021 पासून भारतीय पुऊष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर त्यांचा पहिला कार्यकाळ संपला. त्यानंतर 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची एका वर्षाच्या करारावर पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करार संपल्यानंतर त्यांना पुढे कायम ठेवण्यात आले नाही.
दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा झाली. विशेष म्हणजे, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान सुरू करण्यात आलेला ’बेस्ट फील्डर ऑफ द मॅच’ पदक समारंभ क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंनी या सन्मानावर आपले नाव कोरले.
रायन टेन डुशेट यांचीही कार्यकाळ समाप्ती
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डुशेट यांनी जुलै महिन्यात इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघात हेड ऑफ क्रिकेट स्ट्रॅटेजी म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. नेदरलँड्सचे माजी कर्णधार असलेले टेन डुशेट, गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षक मंडळात सहभागी झाले होते. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गंभीर यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे आली होती.
त्यांच्या कार्यकाळातील यश आणि आव्हाने
रायन टेन डुशेट यांच्या कार्यकाळात भारताने 2025 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले तसेच 2026 पुऊष टी-20 विश्वचषकाचे यशस्वीपणे विजेतेपद कायम राखले. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला या काळात अपेक्षित यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पराभव, तसेच मायदेशात न्यूझीलंडकडून 0-3 आणि दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा मालिकांतील पराभवामुळे भारतीय कसोटी संघाला संक्रमणाच्या टप्प्यात कठीण काळाचा सामना करावा लागला.
बीसीसीआयने दोन्ही प्रशिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, भारतीय क्रिकेटमधील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, अशी नोंद केली आहे.