बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर
मुथूट फिनकॉर्पकडे 2028 पर्यंत अधिकार
वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पुढील दोन हंगामांसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. मुथूट फिनकॉर्पने भारतीय क्रिकेटच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सरशिप हक्क मिळवल्याचे वृत्त आहे. हा करार मार्च 2028पर्यंत लागू राहणार असून, भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेपासून नव्या भागीदारीची सुरुवात होणार आहे.
सुमारे 35 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश
या करारामध्ये पुढील दोन हंगामातील भारताच्या मायदेशातील सुमारे 35 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. यात 10 कसोटी, 12 वनडे आणि 13 टी-20 सामने असण्याची शक्यता आहे. भारतात खेळवल्या जाण्राया या सामन्यांच्या टायटल प्रायोजकत्वामुळे मुथूट फिनकॉर्पला देशभर मोठ्या प्रमाणावर ब्रँड दृश्यमानता मिळणार आहे.
वेस्ट इंडिज मालिकेपासून सुरुवात
भारताच्या आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपासून मुथूट फिनकॉर्पची टायटल स्पॉन्सर म्हणून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. विशेष म्हणजे मुथूट समूहाचे मुख्यालय केरळमध्ये असल्याने कंपनीसाठी ही सुरुवात विशेष ठरणार आहे.
कराराची किंमत किती?
माध्यमांच्या वृत्तानुसार, या कराराची एकूण किंमत सुमारे 150 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. प्रति सामन्यासाठी मुथूट फिनकॉर्पकडून सुमारे 4.3 कोटी रुपये मिळण्याची माहिती आहे. मात्र, या आर्थिक आकडेवारीबाबत बीसीसीआयकडून अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही. बीसीसीआयने या टायटल स्पॉन्सरशिपसाठी प्रति सामना 4.85 कोटी रुपयांचा बेस प्राइस ठेवला होता. यापूर्वी आयडीएफसी फर्स्ट बँक भारतीय क्रिकेटचा टायटल स्पॉन्सर होता आणि त्याचा करार ऑगस्टमध्ये संपला.
व्यावसायिक भागीदारीचा विस्तार
भारतीय क्रिकेटच्या मायदेशातील सामन्यांसाठी बीसीसीआयने अलीकडेच कॅम्पा, एसबीआय लाईफ आणि चॅटजीपीटी यांना असोसिएट पार्टनर म्हणून जोडले आहे. या तीन भागीदारींची एकत्रित किंमत 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. मुथूट फिनकॉर्पच्या टायटल स्पॉन्सरशिपमुळे भारतीय क्रिकेटच्या व्यावसायिक भागीदारीच्या यादीत आणखी एका मोठ्या ब्रँडची भर पडली आहे. भारत-वेस्ट इंडिज मालिकेपासून ही नवी भागीदारी प्रत्यक्षात येणार असल्याने क्रिकेटप्रेमींचेही याकडे लक्ष लागले आहे.