बीसीसीआयची आज वार्षिक बैठक
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची (बीसीसीआय) 93 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक येथे रविवारी होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या नव्या सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे या बैठकीत आयसीसीच्या आगामी बैठकीसाठी पाठविण्यात येणाऱ्या भारताच्या दोन सदस्यांची निवड केली जाईल. बीसीसीआयचे सचीव जय शहा यांची आयसीसीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने आता शहांच्या जागी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याकरिता चर्चा होईल.
संयुक्त अरब अमिरातमध्ये ऑक्टोबर महिन्यात आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 20 ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळविला जाईल. या स्पर्धेपर्यंत म्हणजेच 20 ऑक्टोबरपर्यंत जय शहा बीसीसीआयचे सचीवपदी राहतील. त्यानंतर ते म्हणजेच 1 डिसेंबरला आयसीसीचे चेअरमनपद स्वीकारतील. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी हे आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बीसीसीआयचे पर्यायी संचालक म्हणून उपस्थित राहतील. आयसीसीच्या होणाऱ्या आगामी बैठकीसाठी उपस्थित राहण्याकरिता निवडण्यात येणाऱ्या भारताच्या दोन सदस्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेचे सचीव अनिल पटेल व दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे बेंगळूरमध्ये आयपीएलच्या नियंत्रण मंडळाची बैठक येत्या शनिवारी बेंगळूरमध्ये होणार आहे.