ऑस्ट्रेलियन टी-20 लीगचा उद्घाटनाचा सामना भारतात भारत-ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घोषणा : 12 डिसेंबरला चेन्नईत सामना
► वृत्तसंस्था ऑकलंड, मेलबर्न
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (बीबीएल) टी-20 लीगचा उद्घाटनाचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. हा सामना 12 डिसेंबर रोजी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. परदेशी क्रिकेट लीगचा सामना भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ही घोषणा केली.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट कर्णधार स्टीव्ह वॉ हेसुद्धा उपस्थित होते. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान न्यूझीलंडसाठी रवाना झाले आहेत. ते न्यूझीलंड सरकारसोबत द्विपक्षीय बैठक घेतील आणि त्यानंतर 40,000 भारतीयांना संबोधित करतील.
मोदी ऑस्ट्रेलियाहून न्यूझीलंडमध्ये दाखल
पंतप्रधान मोदी त्यांच्या सहा दिवसांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. 40 वर्षांनंतर न्यूझीलंडला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1986 मध्ये राजीव गांधी यांनी न्यूझीलंडला भेट दिली होती. मोदींच्या स्वागतासाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन स्वत: ऑकलंड विमानतळावर दाखल झाले. येथे पंतप्रधान मोदी पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करतील. तसेच ते भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंड सरकारसोबतच्या द्विपक्षीय चर्चेने होईल. या काळात दोन्ही देश मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप देतील. पंतप्रधान एका व्यावसायिक आणि क्रीडा कार्यक्रमालाही उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान ऑकलंडमधील 40,000 भारतीयांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतीय समुदायाने ‘किया ओरा मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.