बाजारपेठ पूराच्या पाण्याचा विळख्यात ! बाजारभोगाव मधील १५० दुकानात शिरलं पाणी; लाखोंचं नुकसान
बाजारभोगाव वार्ताहर
जांभळी व कासारी खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून बाजारभोगाव बाजारपेठेला पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आली . बाजारपेठेतील सुमारे १५० पेक्षा जास्त दुकाने व काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.काल मध्यरात्री पूराचे पाणी अचानक बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक दुकानदारांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.लाखो रूपयांचा फटका इथल्या व्यापारी व दुकानदारांना बसला आहे.
बाजारपेठ वगळता अध्यापही नागरी वस्तीत पूराच्या पाण्याचा शिरकाव झालेला नाही.त्यामुळे नागरिक व प्रशासन वेट अॕन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. पोहाळे व बाजारभोगाव दरम्यान कोल्हापूर अनुस्कूरा राज्यमार्गावर पाणी आल्याने आज आठव्या दिवशीही वाहतूक बंद होती.तर पोर्ले धरणाजवळील पडसाळी रस्ता पाण्याखाली गेल्याने जांभळी खोऱ्याचा सहाव्या दिवशीही संपर्क तुटला आहे.
सध्या बाजारभोगाव पोहाळेवाडी पोहाळे या बायपास रस्त्याच्या प्रवेशद्वारावर पाणी आले आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे गेळवडे कासारी मध्यम प्रकल्पामधून १४७० क्युसेक प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग कासारी नदी पात्रात होत असल्याने पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
परिसरात वादळी वाऱ्याने मुळे वीजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे पिण्याच्या पाणी पुरवठा व दळपकांंडप करण्यासाठी महिला वर्गाला अडचण निर्माण होत आहे.जांभळी खोऱ्यातील मानवाड ,कोलीक. पडसाळी गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर कासारी खोऱ्यातील गौळवाडा, करंजफेण इंजोली सावर्डी गावात विज गायब आहे,
बाजारभोगाव व परिसरात ज्या गावात पूराचे पाणी येते . तेथील नागरिकांना निवारा केंद्रात जाण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मंडल अधिकारी नलिनी मोहिते यांनी सांगितले . तसेच पूरग्रस्त कुटुंबाना घरात पाणी येण्यापूर्वी स्थलांतर होण्याच्या सूचना घरोघरी जावून दिल्या आहेत. यावेळी .मंडल अधिकारी नलीनी मोहिते सरपंच सीमा नितीन हिर्डेकर तलाठी वीणा कांबळे, प्रज्योत निर्मळे, एकनाथ गंभीरे. ग्रामसेवक सुभाष भोसले, सुरेश पाटील पोलिसपाटील छाया पोवार, सदस्य अमोल कांबळे ,अमर धनवडे , संदीप पाटील, प्रविण पोतदार, सुनिल शिंदे व आपत्ती व्यवस्थापन टीम उपस्थित होती.
दरम्यान आज पोहाळवाडी बायपास रस्त्यावर पाणी आल्याने बाजारभोगाव येथील दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातून जात प्राथमिक आरोग्य केंदाजवळ थांबलेल्या टेंप्पोत दूधाने भरलेले केन पोहोच केले. तर पुराच्या पाण्यातून जात वायरमन व ग्रामस्थांनी बाजारभोगाव गावातील वीज पुरवठा सुरळित केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.