बायणा दरोडा : कसून तपास जारी
शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना : 50 जणांची चौकशी, मात्र सुगावा नाही
वास्को : बायणा येथील ‘चामुंडी आर्केड’ मधील सहाव्या मजल्यावर घातलेल्या दरोडा प्रकरणाचा तपास जारी आहे. मात्र या तपासात विशेष प्रगती झालेली नाही. दरम्यान, या दरोड्यात एकूण 35 लाखांचा ऐवज दरोडेखोऱ्यांनी लुटल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांची विविध पथके दरोडेखोरांच्या मागावर आहेत. मंगळवारी पहाटे अडिचच्या सुमारास सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या नायक पुटुंबाच्या फ्लॅटवर सात ते आठजणांच्या सशस्त्र टोळीने हा दरोडा घातला होता. कुटुंबातील चौघांना मारहाण करून तसेच बांधुन घालून दरोडेखोरांनी सोन्या व चांदीच्या वस्तुंसह लाखोंचा ऐवज लुटला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मंगळवारी पहाटेपासूनच धावाधाव सुरू केलेली आहे. गोव्यात सर्वत्र महत्वाच्या ठिकाणी गस्त ठेवलेली आहे. दरोडेखोरांचा कसून शोध घेण्यात येत असला तरी पोलिसांना अद्याप कोणताही धागादोरा सापडलेला नाही.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण गोव्यातील पोलिसांची विविध पथके दरोडेखोरांच्या मागावर आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत जवळपास पन्नास व्यक्तींना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली. यात बहुतेकजण नायक कुटुंबाच्या व्यवसायात काम करणारे तसेच मजूरवर्गातील आणि बायणा परिसरातील इतर व्यक्ती आहेत. सर्व शक्यता गृहीत धरून विविध मार्गाने या दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत चामुंडा इमारतीबरोबरच विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपास पथकाने जमा पेलेले असून सध्या तरी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी मुख्य आधार ठरलेला आहे. मात्र दोन दिवसांच्या तपासात पोलिसांना अद्याप दरोडेखोरासंबंधी कोणताच सुगावा लागलेला नाही.
दरोडेखोरांनी पस्तीस लाखांचा ऐवज लुटला
या दरोडाप्रकरणी जखमी सागर नायक यांच्या पत्नी हर्षा नायक यांनी अधिकृत पोलिस तक्रार मुरगाव पोलिसस्थानकात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी त्यांच्या फ्लॅटमधून जवळपास पस्तीस लाखांचा सोने चांदी व रोख ऐवज लुटला. ही माहिती दक्षिण गोवा अधीक्षकांनी अधिकृतरित्या जाहीर केली आहे.
जखमी सागर नायक अद्याप गोमेकॉत
फ्लॅटचे मालक जखमी सागर नायक हे अद्याप गोमेकॉमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या जीवावरील धोका टळलेला असला तरी प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना अद्याप काही दिवस गोमेकॉमध्ये उपचार घ्यावे लागणार आहेत.
खासदार विरियातो भेटले कुटुंबाला
बुधवारी रात्री दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी बायणातील नायक कुटुंबियांची भेट घेऊन चौकशी केली. सागर व हर्षा नायक यांची कन्या नक्षत्रा हिचे त्यांनी कौतुक केले.