आपत्तीच्या काळात हक्काचा हात, Bawada Rescue Force ची कोल्हापूरकरांना खंबीर साथ!
कसबा बावड्यातील पन्नास तरुणांनी एकत्र येत बावडा रेस्क्यू फोर्सची स्थापना केली
कोल्हापूर : 2019 आणि 2021 साली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. ही परिस्थिती इतकी भयावह होती की अनेक पशुपक्ष्यांना या आपत्तीत जीव गमवावा लागला. दोन्ही वर्षात अचानक तयार झालेल्या महापूच्या आपत्तीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. यावेळी कोल्हापुरातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाच्या मदतीला धावून आल्या. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला मदत मिळाली.
याचवेळी कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील पन्नास तरुणांनी एकत्र येत बावडा रेस्क्यू फोर्सची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत ही संस्था मदतीसाठी कायम तत्पर आहे. आजवर अनेक रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी राबवले आहेत. 2019 साली कसबा बावडा आणि परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात महापुराच पाणी शिरलं होतं. अचानक आलेल्या महापुरामुळे स्थानिक नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी बावडा रेस्क्यू फोर्स या 50 युवकांच्या टीमने जबाबदारी घेतली.
अगदी महापुराच्या पाण्यात पट्टीचे पोहणारे युवक नागरिकांच्या स्थलांतरासाठी व इतर गोष्टीसाठी मदतीला धावून गेले. कसबा बावडा व आसपासचा परिसर हा शेतवडीचा असल्यामुळे या भागांत ठिकठिकाणी विविध जातीचे साप आढळतात. त्यामुळे या ग्रुपमध्ये पंधरा सर्पमित्रांची टीम असून या टीमद्वारे विषारी बिनविषारी सर्प रेस्क्यू करून त्यांना अधिवासामध्ये किंवा वनखात्यामध्ये देण्यात येतय.
कोरोना महामारीच्या काळात अख्ख जग लॉकडाऊनच्या गडद छायेखाली होतं. कोणीही एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तयार नव्हते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लाखो मृतदेहांचा खच स्मशानभूमीत पहायला मिळायचा. कोल्हापूरमध्ये काहीशी अशीच गंभीर परिस्थिती होती. मात्र त्यावेळीही आपल्या जीवाची बाजी लावून गृपच्या सदस्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्तांवर अंतिम संस्कार केले. त्यांच्या याच कार्याची आणि धाडसाची दखल म्हणून आजवर गृपला अनेक संस्थांकडून गौरवण्यात आलं आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, कोल्हापूर, महानगरपालिका फायर ब्रिगेड यांच्यातर्फे विशेष ट्रेनिंग घेऊन टीम सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तयार असते. नुकतंच या टीमने जरग नगर येथे दोन खारीची पिल्ले झाडावरून पडली होती त्यांना रेस्क्यू केलंय. टीमचे सदस्य कुणाल निकम यांनी त्यांना घरी आणून अगदी छोट्या बाळासारखी त्यांची सुश्रुषा करत आहेत. पिलांचे डोळे उघडल्यानंतर त्यांना आदिवासामध्ये सोडून देण्यात येणार आहे.