For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपसाठी प्रतिष्ठेची...काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

06:11 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपसाठी प्रतिष्ठेची   काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या गोव्यातील दोन जागांसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. भाजप विऊद्ध काँग्रेस इंडिया आघाडी अशी ही थेट लढत अपेक्षित आहे. नाही म्हटल्यास रिव्होल्युशनरी गोवन्स हा प्रादेशिक पक्ष तिसरा घटक रिंगणात आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रादेशिक पक्षांची लोकसभा निवडणुकीतील मक्तेदारी संपुष्टात आली असून प्रमुख राष्ट्रीय पक्षांचेच वर्चस्व उरले आहे. गोव्याच्या एकंदरीत राजकारणावर मजबूत पकड असलेल्या सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची तर काँग्रेस व मित्रपक्षांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही निवडणूक निर्णायक म्हणावी लागेल. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी प्रचाराची जोरदार सुऊवात केली आहे. गोव्यात शिमगोत्सवाची धूम नुकतीच ओसऊन लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे.

Advertisement

गोव्यात लोकसभेच्या उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघ अशा दोनच जागा असल्या तरी राजकीय वर्चस्वाबरोबरच अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणेही बदलण्याचे संकेत मिळतात. ‘अबकी बार चारसौ पार’ या तयारीने मैदानात उतरलेल्या भाजपने दक्षिण गोव्यात प्रथमच एका महिलेला उमेदवारी देऊन वेगळीच रणनीती आखली आहे.

गोव्यातील प्रतिष्ठीत उद्योजक घराण्यातील पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देण्यामागे दक्षिणेची जागा जिंकतानाच भविष्यात गोव्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी देण्याचा भाजपचा डाव दिसतो. येथील प्रमुख खाण उद्योजकांचा पडद्याआड राजकारणावर असलेला प्रभाव व भूमिका सर्वश्रुत असली तरी राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर एकवेळा सावर्डे मतदारसंघातून निवडून आलेले अनिल साळगांवकर सोडल्यास खाण उद्योजक गेल्या साठ वर्षांत राजकारणापासून लांबच होते. सक्रिय राजकारणापासून नेहमीच चार हात लांब असलेल्या धेंपे घराण्यातील एका महिलेलाच भाजपने उमेदवारी दिल्याने सर्वांचेच लक्ष दक्षिण गोव्याकडे लागून राहिले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या इंडिया आघाडीने कॅप्टन व्हिरियतो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या या लढतीत दोन्ही चेहरे नवीन असल्याने तुल्यबळ सामना अपेक्षित आहे. भाजपने आपले सारे लक्ष्य दक्षिण गोव्याकडे केंद्रित करून प्रचाराची जोरदार आघाडी उघडली आहे.

Advertisement

उत्तर गोव्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक सलग पाचवेळा निवडून आल्यानंतर सहाव्यांदा रिंगणात आहेत. ही उमेदवारी मिळवताना त्यांना कधी नव्हे एवढ्या पक्षांतर्गत स्पर्धेला तोंड द्यावे लागले. सन 1999 साली गोव्यात श्रीपादभाऊंनी भाजपचे पहिल्यांदा खाते खोलले व सलग पाचवेळा विजयी होत ही जागा कायम राखली. त्याचवर्षी रमाकांत आंगले हे दक्षिणेतून निवडून आल्याने भाजपने दोन्ही जागा जिंकल्या होत्या.

गोवा मुक्तीनंतर 1963 पासून झालेल्या गेल्या पंधरा लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पाचवेळा उत्तर गोव्यात तर दोनवेळा दक्षिण गोव्यात विजय मिळविला. या पंचवीस वर्षांत गोव्यात राष्ट्रीय पक्षांची पकड मजबूत होत गेली व भाजप विऊद्ध काँग्रेस असेच राजकीय वर्तुळ फिरत आहे. त्यापूर्वी 1963 ते 1971 या काळात ‘मगो’ व ‘युगो’ या दोन प्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय निवडणुकीवर प्रभाव होता. पहिल्या निवडणुकीत तर मगो व मगो पुरस्कृत प्रजासमाजवादी पक्षाचे दोन्ही खासदार निवडून आले. सन 1971 मध्ये काँग्रेसचे पुऊषोत्तम काकोडकर हे पहिल्यांदा खासदार बनल्याने येथून काँग्रेसचा प्रभाव पुढे वाढत गेला. आजवरच्या इतिहासात उत्तर गोव्यातून काँग्रसने चारवेळा, मगो पक्षाने तीनवेळा, भाजपने पाचवेळा तर दक्षिणेतून काँग्रेसने तब्बल अकरावेळा, भाजपने दोनवेळा ही जागा जिंकली आहे. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या खालोखाल सर्वाधिक काळ मगो या प्रादेशिक पक्षाने उत्तरेतून तीनवेळा तर दक्षिणेतून एकवेळा विजय मिळविलेला आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर गोव्यातून काँग्रेसचे उमेदवार असलेले माजी केंद्रीयमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी सन 1996 साली उत्तरेतून मगो पक्षातर्फे ही जागा जिंकली होती.

यंदा उत्तर गोव्यातून श्रीपादभाऊ व खलपभाई अशी तगडी लढत अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या वाढत्या प्रभावाबरोबरच उमेदवारांची संख्याही घटत आहे. 1984 पासून 2014 पर्यंत दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक व अपक्ष, असे आठ ते दहा उमेदवार रिंगणात असत. 1991 मध्ये दक्षिण गोव्यातून अठरा तर उत्तर गोव्यातून पंधरा तसेच 1996 मध्ये दक्षिण गोव्यातून तब्बल एकवीस उमेदवार रिंगणात होते.

सन 1996 मध्ये लोकसभेवर निवडून आलेला मगो या प्रादेशिक पक्षाचा शेवटचा उमेदवार होता. त्यानंतर 1998 पासून मगोची मक्तेदारी संपुष्टात आली. 2009 मध्ये शेवटचा उमेदवार उभा केल्यानंतर गोव्यात प्रादेशिक पक्ष म्हणून प्रभाव असलेल्या मगोनेही या निवडणुकीतून माघार घेतली. मागील निवडणुकीत काँग्रेससोबत असलेला हा पक्ष यंदा भाजपचा मित्रपक्ष आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या दि. 12 पासून सुऊवात होत आहे व प्रचाराचा जोरही वाढत आहे. भाजपने पंधरा दिवसांपूर्वीच दोन्ही जागांवर आपले उमेदवार जाहीर करून प्रचाराची दुसरी फेरी गाठली आहे. काँग्रेसने आज-उद्या करीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडून उशिराच पण जोरदार मुसंडी मारली आहे. डबल इंजिनमुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात गोव्याचा झालेला चौफेर विकास व विविध कल्याणकारी योजना या मुद्द्यांवर भाजपचा मुख्य भर आहे तर काँग्रेसने भाजपवर शरसंधान साधताना लोकशाही धोक्यात, देशाचे संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी, हे प्रचाराचे मुख्य  सूत्र पकडले आहे. दक्षिण गोव्यातील काही संवेदनशील विषयांना हात घालताना काँग्रेसने पर्यावरणीय मुद्दे तसेच दाबोळी विमानतळाकडे मतदारांचे लक्ष वेधले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना महिलाशक्तीचा सन्मान, याकडे भाजपने मतदारांचे लक्ष वेधले आहे. प्रचाराच्या शुभारंभीच काँग्रेसच्या काही नेत्यांमधील अंतर्गत हेवेदावे चव्हाट्यावर आले.

राज्यातील एक तृतियांश विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून मैदानात उतरलेले सर्वच मंत्री आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपाची भिस्त आहे. याशिवाय पक्षापासून दुरावलेले व नाराजांनाही घरवापसी करून मैदान फत्ते करण्याची एक सुनियोजित रणनीती भाजपने आखलेली आहे. एखादा पक्ष सलग दोनवेळा सत्तेवर आल्यानंतर जनतेला बदल हवा असतो. सन 2004 मध्ये सर्वत्र शायनिंग इंडियाचे वारे असतानाही बाजू पलटली होती. त्याच्या पुनरावृत्तीचा धोका टाळण्यासाठी भाजपाला यंदा कुठलीच कसर सोडायची नाही, हे त्यांच्या एकंदरीत तयारीतून दिसते. त्यामुळे काँग्रेस इंडिया आघाडीपुढे मोठे आव्हान आहे. मतदानाला अवघे 25 दिवस राहिले असून उर्वरित दिवसांत दोन्ही पक्षांची कसोटी लागणार हे निश्चित...!

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :

.