फलंदाजी दर्जेदार...आता कसोटी नेतृत्वाची !
इंग्लिश दौरा हा नेहमीच फलंदाजांची परीक्षा पाहणारा असतो. परंतु शुभमन गिलनं लागोपाठ दोन कसोटींत शतकं फटकावून आपला दर्जा पुरेपूर दाखवून दिलाय...कर्णधारपदाचा भार नुकताच खांद्यावर येऊन पडलेला असताना त्यानं कसल्याच दबावाखाली न येता ही कामगिरी केलीय हे विशेष...मात्र आता कसोटी त्याच्या नेतृत्वाची असून पहिल्या सामन्यातील काही ठळकपणे जाणवलेल्या चुकांना सुधारून त्यानं आपल्यामधील ‘कॅप्टन’ही तितकाच कुशल असल्याचं सिद्ध करणं गरजेचं...
दुसऱ्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यास 30 मिनिटं बाकी...भारतीय कर्णधार शुभमन गिलनं ज्यो रूटला दोन घणघणीत स्वीप फटके लगावले अन् पूर्ण केलं ते आपलं मालिकेतील आणखी एक शतक...भारताचं कर्णधारपद मिळाल्यानंतर तिसऱ्या डावातील दुसरं...2018 साली इथंच विराट कोहलीनं महान बनण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला होता हे विशेष...इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली वापरलेल्या सर्व डावपेचांना गिलनं तोंड दिलं ते दर्जेदार बचावात्मक फटके, खास करून त्याचा ‘ट्रेड मार्क’ ‘पंची शॉट’ आणि संयम यांच्या साहाय्यानं...शुभमननं इंग्लंडविरुद्ध सहा सलग कसोटी सामन्यांत 50 हून अधिक धावा जमविलेल्या असून वैझाग इथं 34 व 104, राजकोटमध्ये 0 नि 91, रांचीत 38 अन् 52, धर्मशालामध्ये 110 आणि लीड्स कसोटीत 147 व 8 अशी त्याची यापूर्वीची वाटचाल...
या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्याला प्रारंभ होण्यापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही...पत्रकारानं विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला, ‘मी प्रामुख्यानं फलंदाज असून माझं सगळं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते मालिकेत सर्वांत जास्त धावा नोंदविण्यावर’...त्या उत्तराचं सर्वांनाच अतिशय कौतुक वाटलं. कारण गिलची स्पष्ट विचार करण्याची पद्धत त्यात अनेकांना दिसली. त्यानं विचार व्यक्त केले ते कुठंही न बावरता, न गडबडता...तो ठरलाय कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्याच डावात शतक फटकावणारा भारताचा पाचवा फलंदाज...
जेव्हा एखादा संघ धावांचा डोंगर रचतो तेव्हा त्याला दिशा देणं फारसं कठीण नसतं. भारताचं देखील तसंच झालं आणि प्रत्येकाला वाटलं की, शुभमन गिलवर त्याच्या संघाला वाट दाखविताना फारशा कष्टांना तोंड देण्याची पाळी येणार नाहीये...पण पहिल्या कसोटीचा पहिला दिवस संपला अन् त्यानंतरच्या चार दिवसांत त्याला हव्या त्या पद्धतीनं फारसं काही घडलं नाही. विशेष म्हणजे किमान तीन सत्रांवर वर्चस्व गाजवून देखील सध्या भारत कसोटी मालिकेत 0-1 असा पिछाडीवर पडलाय. त्याच्या फलंदाजीनं कर्णधारपदाच्या दबावाला यशस्वीरीत्या तोंड दिलेलं असलं, तरी त्याला नेतृत्वातील अनेक खाचाखुचा शिकाव्या लागतील हे स्पष्ट दिसलं...
कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत पराभव स्वीकारण्याची पाळी आली म्हणून गिलचं सर्वंकष विश्लेषण करणं योग्य ठरणार नसलं, तरी एक गोष्ट मान्य करायलाच हवी की, 25 वर्षीय नि भारतीय कर्णधारांच्या यादीतील पाचवा सर्वांत तरुण खेळाडू असलेल्या शुभमनला इंग्लंडमध्ये नि:संशयपणे गिरवावे लागतील ते कुशल नेतृत्वाचे धडे...इंग्लंडच्या फलंदाजांना तेथील भूमीवर सामोरं जाणं ही सोपी गोष्ट नव्हे. भारताच्या जवळपास प्रत्येक कर्णधाराला तिथं घाम फुटलाय हे कबूल करावंच लागेल. शिवाय सध्याच्या खेळपट्ट्या पूर्वीप्रमाणं गोलंदाजांना मदत करणाऱ्या राहिलेल्या नाहीत...
जर शुभमन गिलला भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर आपला मारा वापरण्याची संधी मिळाली असती, तर कदाचित इंग्लंडचे तीन तेरा वाजण्यास वेळ लागला नसता. परंतु लीड्सनं स्पष्ट केलंय की, भारतीय कर्णधाराच्या पदरात आगीशी झुंजल्याशिवाय काहीही पडणं कठीण...प्रशिक्षक गौतम गंभीरचं समर्थन कर्णधाराला मिळणार यात शंकाच नव्हती. अपेक्षेनुसार गंभीर म्हणाले, ‘ही जागा एखाद्या नवीन कर्णधारासाठी योग्य नव्हे. त्याला सरळ समुद्रात ढकलल्याप्रमाणं स्थिती होण्याचीच शक्यता जास्त. गिलनं पहिल्या डावात अतिशय आकर्षक पद्धतीनं फलंदाजी केलीय आणि तो प्रत्येक दिवशी नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न खात्रीनं करेल’...
प्रत्येक प्रशिक्षकाला त्याच्या कर्णधाराचं 100 टक्के समर्थन करण्याचा हक्क असला, तरी शुभमनच्या अनेक निर्णयांनी समालोचकांच्या पॅनलला अचंबित केलं...उदाहरणार्थ शार्दुल ठाकूरला त्यानं इंग्लंडच्या पहिल्या डावात पुन्हा गोलंदाजी दिली ती चक्क 101 षटकं संपल्यानंतर. अष्टपैलू शार्दुलनं त्यापूर्वी फक्त सहा षटकं टाकली होती. कित्येक विश्लेषकांच्या मते, इंग्लंडमध्ये चेंडूला विविध करामती करण्याच्या सवयी असल्यानं गरज होती ती त्याच्या हाती 40 षटकं पूर्ण होण्याआधीच चेंडू सोपविण्याची. खेरीज ज्यो रूटला त्याच्यासमोर आत्मविश्वासानं कधीही खेळणं जमलेलं नाहीये...
खेरीज शुभमन गिलला टीका सहन करावी लागलीय ती क्षेत्ररक्षणाच्या रचनेवरून. पाचव्या दिवशी भारताला गरज होती ती आक्रमक पद्धतीनं प्रतिहल्ला करण्याची, इंग्लंडच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविण्याची. पण गिलनं स्लिपमध्ये सुरुवातीलाच कमी क्षेत्ररक्षक लावल्यानं संघ जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही हे स्पष्ट झालं आणि त्याचा मानसिक लाभ मिळाला तो इंग्लंडचे सलामीचे फलंदाज बेन डकेट व झेक क्रॉली यांना. डकेटच्या बॅटच्या कडांना स्पर्श करून गेलेले चेंडू अनेकदा यष्टिरक्षकाच्या पाठीमागं रवाना झाले. पण भारतीय कर्णधारानं क्षेत्ररक्षणात बदल न करण्याची चूक केली...
पहिल्या डावात सुद्धा जेव्हा ख्रिस वोक्स व ब्रायडन कर्स यांनी कुठल्याही दबावाला तोंड न देता फलंदाजी केली तेव्हा आवश्यकता होती ती वेळ न गमावता बुमराह वा जडेजाच्या हातात चेडू देण्याची. पण जेव्हा तसं करण्यात आलं तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या धावसंख्येत 50 महत्त्वाच्या धावांची भर घातली होती. कुठल्याही कर्णधाराला जेव्हा गोलंदाजांना तुटून पडणं जमत नाही वा महत्त्वाचा गोलंदाज दुखापतीनं त्रस्त असतो किंवा माऱ्यात विविधता नसते तेव्हा प्रतिस्पर्ध्याला तोंड देणं सोपं नसतं. या पार्श्वभूमीवर अन्यायाला सातत्यानं तोंड दिलेल्या कुलदीप यादवला संघात स्थान देणं हा अतिशय योग्य निर्णय ठरला असता. मात्र पहिल्या कसोटीप्रमाणं बुधवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याला डावलणंच पसंत करण्यात आलंय...
1967 साल आठवतंय ?...तशी शक्यता कमीच. पण त्यावेळी टायगर पतौडी यांनी इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केला होता. पतौडींच्याच डावपेचांना पुढं भारतीय खेळपट्ट्यांवर स्थान मिळालं आणि प्रत्येक विदेशी संघाला आम्ही अगदी सहज गारद केलं...याउलट 2018 साली मात्र विराट कोहलीनं अचानक संघात समावेश केला तो तब्बल चार जलदगती गोलंदाजांचा. थोडक्यात सांगायचं झाल्यास जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते तेव्हा अशा विविध योजना तयार कराव्या लागतात. शुभमन गिलला देखील शिल्लक राहिलेल्या कसोटींत अशा प्रकारचे अनेक निर्णय घ्यावे लागतील...
शुभमन गिलच्या नेतृत्वात आत्मविश्वासाचा अभाव कुठंही दिसला नाही हे मात्र मान्य करावंच लागेल. कदाचित ‘गुजरात टायटन्स’चं अधिपत्य केलेलं असल्यामुळं तसं घडलेलं असावं...त्याच्यामध्ये सर्व स्टेडियमसमोर आक्रमकतेचं दर्शन घडविणारा विराट कोहली वा चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दाखविणारा रोहित शर्मा नसला, तरी गिलची स्वत:ची अशी एक शैली असून तिचं कौतुक करावंच लागेल. पाचव्या दिवशी जेव्हा सामना भारताच्या हातातून निसटत होता तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं ते स्मितच...दुसरी कसोटी सुरू झालीय अन् आता सज्ज राहावं लागेल ते प्रशंसेच्या किंवा टीकेच्या वर्षावाला सामोरं जाण्यास !
- राजू प्रभू