न्हाऊ घालिते तान्ह्या बाळा...
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
लग्नानंतर अवघ्या 20 वर्षांनी पतीचे निधन झाले अन् खाडे काकींवर दु:खाचा डोंगरच कोसळला. उत्पन्नाचा आधारच खुंटल्यामुळे आपल्या चार मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. पण दु:खाला कुरवाळत न बसता त्या घराबाहेर पडल्या. मिळेल त्या घरातील धुणी-भांडी करायची आणि मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असा त्यांनी चंग बांधला. सुरुवातीस काही वर्षे त्यांनी धुणी-भांडी केली. पण त्यानंतर त्यांनी नवजात बाळांना अंघोळ घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना उत्पन्न वाढविण्याचा राजमार्ग मिळाला. न थकता त्यांनी आपले काम सुरुच ठेवले. मुलांना शिक्षण देऊन मोठे केले. आणि पतीच्या निधनानंतरही आपल्या कुटूंबाचा कणा नेहमी ताठ ठेवला.
कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे सुनंदा खाडे काकींनी सिध्द करून दाखवले. शिक्षण घेवून एखादे स्टार्टअप सुरू करून उद्योजक किंवा व्यवसायिक होता येते असे म्हणतात. पण खाडे काकींनी गेल्या 33 वर्षापासून केवळ कौशल्याच्या जोरावर बाळांना पारंपरीक अंघोळ घालण्याच्या माध्यमातून संसार फुलवला आहे. पती वारल्यानंतर चार मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, लग्न करून त्यांना त्यांच्या पायावर उभा तर केलेच. शिवाय नऊ वर्षापुर्वी त्यांनी दुमजली घर बांधून त्याचे कर्जदेखील फेडले आहे. आज त्यांनी अंघोळ घातलेली मुले डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक होऊन समोर आल्यानंतर खाडे काकूंचा आनंद गगनात मावेनासा होतो.
सुनंदा विलास खाडे या पायमल वसाहत, जागृती नगर येथील रहिवासी आहेत. त्यांना आपले लग्न किती साली झाले हे आठवत नाही. परंतू त्यांचे पती विलास खाडे यांचा मृत्यू 22 वर्षापुर्वी झाला. यावेळी त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका मुलीचे लग्न झाले होते. परंतू दुसऱ्या दोन मुली व एक मुलगा यांचा सांभाळ कसा करायचा ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. सुरूवातीला एका घरातील धुणे-भांडी करणाऱ्या काकींना महिन्याला 150 रूपये पगार मिळत होता. चार-पाच घरची धुणी-भांडी केल्यानंतर दीड ते दोन हजार रूपये मिळायचे. त्यातून त्या मुलांचा सांभाळ करायच्या. पुढे मात्र मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढल्यानंतर त्यांना अर्थिक टंचाई जाणवू लागली. त्यामुळे खाडे काकींनी नवजात बाळांना आंघोळ, मालीश करण्याचे काम सुरू केले. त्यातून घर चालवण्यापुरते पैसे मिळू लागले. पुढे काकींची माऊथ पब्लिसीटी ऐवढी झाली की त्यांना बाळाला अंघोळ घालण्याची भरपूर कामे मिळू लागली. त्यामुळे काकींच्या दिवसाची सुरूवात पहाटे साडेपाच वाजता होते. सकाळी आठ-साडेआठ वाजता घरातून बाहेर पडतात. चार-पाच घरातील बाळांना आंघोळ-मालीश करून त्या दुपारी दोनच्या सुमारास घरी येतात. अनेकदा तर पुन्हा सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत हे काम सुरुच राहते. या माध्यमातून त्या महिन्याला 20 ते 25 हजार रूपये मिळवतात.
आज वयाच्या साठीनंतरही त्या बाळाला आंघोळ घालण्यासाठी चालत जातात. परिणामी दररोजच्या चालण्यामुळे काकींना शुगर, रक्तदाब किंवा इतर कोणताही आजार जडलेला नाही. बाळाला आंघोळ घालताना बाळ रडत असेल तर काकी चांदोमामासह इतर गाणी गात त्या बाळाचे मनोरंजन करून त्यांना गप्प करतात. आपलीच नात किंवा नातू असल्याप्रमाणे त्या बाळाला लळा लावतात. परिणामी प्रत्येक घरामध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मी काम म्हणून बाळाला आंघोळ घालत नसून आपल्या नातवंडाप्रमाणे त्यांच्याकडे पाहते. वर्षातील बारा महिने एकच काम करत असल्यामुळे एखाद्या दिवशी बाळाला आंघोळ घालण्याचे काम नसेल तर मला करमत नाही असे त्यांनी ‘तरुण भारत संवाद’ शी बोलताना सांगितले.
- आता नातवंडांच्या शिक्षणाकडे लक्ष
सूनेचे आणि माझे नाते मैत्रिणींसारखे आहे. काम करून घरात आल्यानंतर ती मला घरातील कोणतेच काम करू देत नाही. तसेच नातीबरोबर माझे मन रमते, ठरवलेले सर्व काही पूर्ण झाले आहे. आता फक्त नातवंडांचे शिक्षण अन् लग्न पाहण्याची इच्छा आहे, त्यामुळे हातपाय चालतात तोपर्यंत काम करून, आरोग्यदायी जीवन जगण्याचा प्रयत्न करणार.
सुनंदा खाडे (पायमल वसाहत, जागृतीनगर कोल्हापूर)