नववर्षावेळी बर्फाळ पाण्यात स्नान
ज्या ऋतूत लोक स्नान करणे टाळतात, त्या काळात लोक बर्फाळ पाण्यात उडी घेत असतात. कॅनडात एक ठिकाण आहे, जेथे शेकडो लोक दरवर्षी नववर्षाच्या प्रारंभी एकत्र येतात आणि अजब परंपरेचा हिस्सा होतात. हे लोक या ठिकाणी येत बर्फाळ पाण्यात उडी घेतात.
या परंपरेला ‘पोलर बियर डिप’ म्हटले जाते. याचे आयोजन दरवर्षी 1 जानेवारी रोजी कॅनडाच्या ओकविले शहराच्या लेक ओन्टारियोमध्ये केले जाते. ही परंपरा 39 वर्षी जुनी असून 1 जानेवारी 2025 रोजी या परंपरेला 40 वर्षे पूर्ण होणार आहेत. या परंपरेसाठी एक वेबसाइट देखील तयार करण्यात आली असून त्यावर लोक नोंदणी करतात. नोंदणीचे शुल्क सुमारे 1600 रुपये आहे.
या कार्यक्रमात लाइव्ह म्युझिक, खाण्यापिण्याची सुविधा, नाचगाणेही असते. करेज पोलर बियर डिपची सुरुवात 1985 साली झाली होती. गाये करेज नावाच्या महिलेने नववर्षाच्या पहिल्या दिनी स्वत:च्या दोन्ही मुलांना टॉड आणि ट्रेंटला लवकर स्नान करून घेण्यास सांगितले, परंतु दोघेही याकरता टाळाटाळ करत राहिले. तेव्हा त्यांनी या ऋतूत सरोवरात जात उडी घेतली तर त्यांना शूर मानेन, असे आव्हान मुलांना दिले. दोन्ही मुलांनी हे आव्हान स्वीकारत यात स्वत:च्या मित्रांनाही सोबत घेत बर्फाळ पाण्यात उडी घेतली होती. तेथूनच ही काहीशी अनोखी प्रथा सुरू झाली. पुढील वर्षी अनेक लोक तेथे जमले आणि हळूहळू ही संख्या वाढत गेली. करेज बंधूंनी या परंपरेला चांगल्या कामाशी जोडण्याचा निर्णय घेतला. 1995 मध्ये वर्ल्ड व्हिजन पॅनडासोबत मिळून विकसनशील देशांसाठी स्वच्छ पाण्याच्या व्यवस्थेवरून एक फंड तयार करण्यात आला. आता दरवर्षी लोकांकडून काही देणगी मागण्यात येते. यातून जमलेली रक्कम या फंडमध्ये सामील केली जाते.