आंघोळीच्या पाण्याचा साबण
आंघोळ करताना साबण उपयोगात आणण्याची पद्धत अनेक दशकांपासून प्रचलित आहे. माणसांच्या आंघोळीचे असे विशेष साबण अनेक कंपन्या निर्माण करतात. त्यामुळे आंघोळीचे साबण हे आपल्या परिचयाचे असतात. पण आंघोळीच्या पाण्याचा साबणही बनविला जातो आणि तो विकलाही जातो, ही बाब आपल्यापैकी अनेकांना निश्चितच नवी वाटणार आहे. हॉलीवुडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्विनी हिने असा एक साबण बाजारात आणला आहे.
‘सिडनीज बाथवॉटर ब्लिस‘ असे या साबणाचे नाव आहे. हा साबण चक्क या नटीच्या आंघोळीच्या पाण्यापासून निर्माण करण्यात आला आहे. ही नटी आंघोळ केल्यानंतर आपल्या आंघोळीचे सांडपाणी साठवते आणि त्याच्यापासून हा साबण निर्माण केला जातो, अशी माहिती देण्यात आली आहे. हा साबण विशेषत: पुरुषांसाठी आहे. हा अद्भूत साबण या नटीने ‘डॉ. स्क्वॅच ब्रँड’ या कंपनीशी सहयोग करुन निर्माण केला आहे. तो एक्सफोलिएटिंग बार साबण, वाळू, पाईन बर्क एक्स्ट्रॅक्ट आणि सिडनी स्विनी हिने आंघोळ केल्यानंतर ते पाणी, असा वस्तूंपासून निर्माण करण्यात आला आहे. या साबणाला पाईन, डग्लास फेअर आणि मिटी मॉसचा सुगंध येतो असे म्हटले जाते. या नटीच्या म्हणण्यानुसार या साबणाचा सुगंध केवळ आल्हाददायकच नाही, तर अविस्मरणीय आहे.
हा साबण आता बाजारात उतरण्याच्या सज्जतेत आहे. त्याचे लाँचिंग 6 जूनला केले जाणार आहे. त्याच्या केवळ 5 हजार वड्याच उपलब्ध राहणार आहेत. कारण या नटीच्या आंघोळीचे पाणी असे असून किती असणार ? आणि हे पाणी तर या साबणाचा प्रमुख ‘इनग्रिडियंट’ आहे. त्यामुळे तो केवळ मर्यादित स्वरुपातच उत्पादित केला जाणार आहे. प्रत्येक साबणाच्या वडीची किंमत 8 डॉलर आहे. याशिवाय 100 वड्यांचा एक ‘गिफ्टअवे’ही आयोजित होणार आहे. तो घेण्यासाठी ग्राहकाला पैसे मोजावे लागणार नाहीत. मात्र, काही अटींचे पालन करावे लागणार आहे. काही जणांच्या मते हा सारा प्रयत्न लोकांना मूर्ख बनविण्याचा आहे. केवळ सिडनी स्विनी हिच्या लोकप्रियतेचा लाभ उठविण्यासाठीचा हा उद्योग आहे. तथापि, नटीच्या आंघोळीच्या पाण्याचा साबण ही कल्पनाच अद्भूत आहे, अशीही काही लोकांची प्रतिक्रिया आहे. एकंदर काय, तर ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ असे म्हणतात, त्याचे प्रत्यंतर आंघोळीच्या पाण्याच्या साबणाने येत आहे.