'रिल्स स्पॉट' बनलेले बसरा स्टार जहाज जाणार भंगारात
रत्नागिरी :
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने दुबईहून मालदिवला जात असताना 3 जून 2020 रोजी अरबी समुद्रात भरकटलेले बसरा स्टार हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या किनारी येऊन धडकले आणि आजही त्या ठिकाणी अडकून आहे. गेली पाच वर्षे हे ठिकाण पर्यटक, तरुण-तरुणींसाठी रिल्स स्पॉट बनला आहे. पण आता हे जहाज भंगारात निघणार असल्याने हा बेस्ट स्पॉट व स्थानिकांचा रोजगारही थांबणार आहे.
येथील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे जहाज काढण्यात येणार आहे. सुमारे 35 कोटींचे हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. याबाबत एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. 500 मेट्रिक टन वजनाचे हे जहाज 15 दिवसांत परवानगी मिळाल्यावर भंगारात काढले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.