Basra Star Ship : अजस्त्र लाटांमुळे किनाऱ्यावर अडकलेल्या 'बसरा स्टार' जहाजाचे दोन तुकडे
मागील 6 वर्षारापासून मिऱ्या किनाऱ्यावर, भंगार जहाजाची वाताहात
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून शहराजवळच्या मिऱ्या किनारी गेली सहा वर्षे लाटांचा मारा खात ‘बसरा स्टार’ जहाज एकाच जागी अडकून पडलेले होते. गेले काही दिवस किनाऱ्यावर धडकणाऱ्या अजस्त्र लाटांच्या माऱ्यामुळे या जहाजाचे आता दोन तुकडे झाले आहेत. लाटांमुळे जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने हे जहाज आता भग्न झाले आहे.
मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला टेकलेले हे जहाज काढण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत त्या जहाजाच्या मालकाला येथील प्रशासन स्तरावरून मुदतही देण्यात आली. प्रशासन या जहाजाची विनाविलंब मोडणी करण्यासाठी गुंतलेले आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे.
मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या 1200 मीटर कामाचा (पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंत) टप्पा शिल्लक आहे. या कामात या अडकलेल्या जहाजाचा व्यत्यय निर्माण झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात गेलेले जहाज येथील पर्यटनाचे केंद्र बनलेले होते. कारण त्या जहाजाच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पडणाऱ्या रिल्समुळे जहाज पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटकांची दरदिवशी तेथे वर्दळ वाढलेली होती. त्यामुळे लगतच्या स्थानिकांनाही रोजगाराचे साधन निर्माण झाले होते.