भारतात प्रथमच बास्केटबॉल लीगचे आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात आयपीएल सुरू झाल्यानंतर, प्रो कब•ाr, इंडियन सुपर लीग, खोखो लीग आणि टेबल टेनिस लीग अशा अनेक स्पर्धा सुरु झाल्या. व्यावसायिक पद्धतीने सुरु झालेल्या या स्पर्धांना चांगलेच यश मिळवत असून आता खेळाडूंना आणखी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि एसीजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी मिळून व्यावसायिक बास्केटबॉल लीग सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. ही लीग स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी असणार आहे.
बास्केटबॉल केवळ एक खेळ नसून नेतृत्व आणि संधी निर्माण करण्याचे एक साधन आहे, तळागाळातील उपक्रमांपासून सुरु होणारा आमचा दशकभराचा प्रवास, तरुण खेळाडूंना पुढील भविष्यासाठी संधी निर्माण करून देणार असल्याचे एसीजीचे व्यवस्थापकीय संचालक करण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, याआधी भारतात बास्केटबॉल लीग स्पर्धा खेळवली गेलेली नाही. अर्थात, बास्केटबॉल हा जगातील दुसरा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. पण, भारतात या खेळाला हवे तितके प्रोत्साहन मिळत नाही. या लीग स्पर्धेमुळे, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच हा खेळ येत्या 10 ते 15 वर्षांत क्रिकेटला मागे सोडून पुढे जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल लीग (एनबीएल) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेरेमी लोएलिगर यांची एसीजी स्पोर्ट्सचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यावाहिल्या बास्केटबॉल लीगचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.