For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बशीरहाट ठरणार ‘निसरडे’ स्थान

06:41 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बशीरहाट ठरणार ‘निसरडे’ स्थान
Advertisement

पश्चिम बंगालमधील बशीरहाट हा लोकसभा मतदारसंघ सीमावर्ती असून तो बांगलादेशला लागून आहे. या मतदारसंघाची बांगलादेशला भिडलेली सीमा पुष्कळशी मोकळी असल्याने बांगलादेशातून येथे मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. भारतात घुसखोरी करणाऱ्यांसाठीही ही सीमा वरदान मानली जाते. निवडणुकीच्या काळात बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बनावट मतदार येथे येऊन मतदानही करतात, असे अनेकदा अनुभवास आलेले आहे.

Advertisement

बशीरहाट मतदारसंघ हा मुस्लीम बहुल आहे. येथे मुस्लीम मतदारसंख्या 54 टक्के असून हिंदूंची मतदारसंख्या 45 टक्के आहे. त्यामुळे हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. गेल्या निवडणुकीत येथून या पक्षाच्या उमेदवार नुसरत जहान या 54.46 टक्के मते मिळवून निवडून आल्या होत्या. तथापि, यावेळी त्यांना या पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याजागी हाजी नुरुल इस्लाम या धार्मिक नेत्याला तृणमूल काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

संदेशखाली प्रकरणाचा परिणाम

Advertisement

साधारणत: दहा महिन्यांपूर्वी या भागात ‘संदेशखाली प्रकरणा’मुळे खळबळ उडाली आहे. या भागातील तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या ईडीच्या दलावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे प्रकरण पेटले. शहाजहान शेख याची या भागात पूर्वीपासून दहशत आहे. अनेक हिंदू मागासवर्गीय, आदीवासी आणि दलितांची घरे आणि शेती हडपणे, या समाजांमधील महिलांवर बलात्कार करणे, आदी आरोप शेख आणि त्याच्या टोळीतील इतरांवर करण्यात येत होते. अनेक महिलांनी या अत्याचारांविरोधात प्रदीर्घ काळ आंदोलन चालविले होते. पण या आंदोलनाची दखल राज्य शासनाने किंवा मिडियानेही घेतली नव्हती. तथापि, अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले आणि त्यासमवेत संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचार आणि जमीनी हडपण्याची प्रकरणेही चव्हाट्यावर आली. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ती सीबीआयकडे तपासासाठी सोपविली. त्यानंतर शहाजहान शेख याला अटक करण्यात आली. तो सध्या कोठडीत आहे.

अवतीभोवतीच्या मतदारसंघांवर परिणाम

संदेशखाली प्रकरणामुळे व्यक्तीश: ममता बॅनर्जी यांचीही प्रतिमा खालावली आहे. त्यामुळे बशीरहाट मतदारसंघाच्या अवतीभोवती जे मतदारसंघ आहेत, तिथे या संदेशखाली प्रकरणाचा मोठा प्रभाव जाणवत असून मतदारांचे ध्रूवीकरण झाल्याचे तज्ञांचे मत आहे. बशीरहाट हा मतदारसंघ आजही तृणमूल काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. कारण तो मुस्लीम बहुल आहे. पण या मतदारसंघाच्या शेजारी असणाऱ्या हिंदू बहुल मतदारसंघांमध्ये तृणमूलला अडचण येऊ शकते, असे मत आहे. त्यामुळे बशीरहाट ही या पक्षासाठी निसरडी जागा ठरु शकते.

पोलिसांना मतदानाची अनुमती द्या!

मिझोराम राज्यातील एक हजाराहून अधिक पोलीस निवडणुकीच्या कामासाठी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेलेले असल्याने त्यांनाही त्यांचा मतदानाचा अधिकार उपयोगात आणण्याची अनुमती द्यावी, असे आवाहन मिझोरामचे राज्यसभा खासदार के. व्हानलालवेना यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला बुधवारी केली आहे. मिझोराम राज्यात लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे. तेथील 1,047 पोलिसांना निवडणुकीसंबंधीच्या कामासाठी बाहेर नेण्यात आले आहे. त्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघात मतदान करु शकलेले नाहीत. मिझोराम लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या अल्प आहे. त्यामुळे ही हजाराहून अधिक मतेही महत्वाची भूमिका साकारु शकतात. त्यामुळे या पोलिसांना पोस्टल मते देण्याची अनुमती द्यावी. मतगणनेला अद्याप काही दिवसांचा अवधी आहे. त्या काळात ही मते संकलित केली जाऊ शकतात. पोलीस हे नागरीकच असल्याने त्यांना कोणत्याही कारणास्तव मतदानापासून वंचित ठेवणे योग्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पूर्वीच केली होती विनंती

मिझोरामच्या पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला यापूर्वीच विनंती पत्र पाठविले होते. तथापि, तांत्रिक कारणास्तव पोलिसांना मतदान करण्याची अनुमती देता येत नाही, असे निवडणूक आयोगाने त्यावेळी कळविले होते. तरीही मी पुन्हा विनंती करीत आहे, असे या खासदारांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.